पश्चिम किनारपट्टीवर ‘सागरकवच-०२/२६’ संयुक्त सुरक्षा सराव यशस्वी संपन्न; घुसखोरी रोखण्यात यंत्रणेला मोठे यश

पश्चिम किनारपट्टीवर ‘सागरकवच-०२/२६’ संयुक्त सुरक्षा सराव यशस्वी संपन्न; घुसखोरी रोखण्यात यंत्रणेला मोठे यश

महाराष्ट्र व गोव्याच्या किनारपट्टीवर ४ हजार ८०० जवान तैनात; मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून प्रत्यक्ष आढावा

रत्नागिरी :पश्चिम किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेचे जाळे अधिक मजबूत आणि अभेद्य करण्याच्या उद्देशाने भारतीय तटरक्षक दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सागरकवच-०२/२६’ या दोनदिवसीय संयुक्त किनारी सुरक्षा सरावाचा यशस्वी समारोप झाला. या सरावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे प्रत्यक्ष भेट देऊन संपूर्ण राज्यभरातील सागरी सज्जतेचा उच्चस्तरीय आढावा घेतला. या संपूर्ण सरावादरम्यान संवेदनशील भागांतील संभाव्य हल्ले आणि घुसखोरांचे मनसुबे उधळून लावत सागरी पायाभूत सुविधांचे रक्षण करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठे यश आले आहे.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर अभेद्य पहारा :

भारतीय तटरक्षक दलाकडून ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र आणि गोव्याच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर या विशेष सरावाचे आयोजन करण्यात आले होते. सागरी सुरक्षेतील त्रुटी शोधणे, आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षा दलांची कार्यक्षमता तपासणे आणि सर्व यंत्रणांमधील प्रत्यक्ष समन्वय अधिक गतिमान करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. या संयुक्त मोहिमेत विविध सुरक्षा दले व सागरी घटकांचे तब्बल ४ हजार ८०० हून अधिक जवान व प्रतिनिधी सक्रियपणे सहभागी झाले होते.

Ronic

गिरगाव चौपाटीवर थरारक संयुक्त प्रात्यक्षिक :

मुख्य सचिवांच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि तटरक्षक दलाच्या जलद कृती दलाने (आरआरटी) गिरगाव चौपाटी येथे आक्रमक व थरारक संयुक्त प्रात्यक्षिक सादर केले. सुरक्षाव्यवस्थेची खरी क्षमता तपासण्यासाठी रेवदंडा, अलिबाग, पालघर, गोवा तसेच प्रमुख लँडिंग पॉईंट्ससारख्या अत्यंत संवेदनशील भागांतून एकाच वेळी बनावट हल्ले आणि घुसखोरीचे प्रसंग निर्माण करण्यात आले होते. या सर्व आव्हानांना स्थानिक पातळीवरील सुरक्षा पथकांनी चोख प्रत्युत्तर दिले.

माझगाव डॉकयार्डवर विशेष मोहीम; शत्रूच्या कारवाया निष्प्रभ :

या संपूर्ण सरावात माझगाव डॉकयार्ड लिमिटेड येथील महत्त्वपूर्ण सागरी पायाभूत सुविधांच्या संरक्षणासाठी राबविण्यात आलेली विशेष रणनीती मोहीम प्रमुख आकर्षण ठरली. शत्रूच्या घातपाती कारवाया तत्काळ निष्प्रभ करत या संवेदनशील ठिकाणाचे यशस्वी रक्षण करण्याचे प्रात्यक्षिक एनएसजी आणि आरआरटीने संयुक्तरीत्या पूर्ण केले.

नौदल व तटरक्षक दलाची जहाजे, विमाने आणि होवरक्राफ्ट तैनात :

या अभेद्य सुरक्षा सरावासाठी भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका, गस्ती जहाजे, डॉर्नियर टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर्स तसेच जमिनीवर व पाण्यावर धावणारी एअरकुशन व्हेईकल्स (होवरक्राफ्ट) मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आली होती. दोन दिवस चाललेल्या या धडक सरावामुळे राज्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम आणि सतर्क झाली आहे.