नेरूळ ग्रामपंचायतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न

नेरूळ ग्रामपंचायतीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न

‘नालसा जागृती’ व ‘संवाद’ योजनांद्वारे मोफत कायदेशीर मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन; वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. आर. पाटील यांचे मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नेरूळ ग्रामपंचायत येथे रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ३० सप्टेंबर २०२६ रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे (लीगल अवेअरनेस प्रोग्राम) यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. आर. पाटील आणि ॲड. मधुमती कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक हक्क आणि मोफत शासकीय विधी सेवांबाबत सविस्तर व मोलाचे मार्गदर्शन केले.

‘घर घर में न्याय की जागृती’साठी ‘नालसा जागृती’ योजना :

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश आर. आर. पाटील यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) ‘जागृती (JAGRITI) योजना २०२५’ ची माहिती दिली. ते म्हणाले की, "घर घर में न्याय की जागृती" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेली ही योजना अत्यंत दूरगामी आहे. देशातील अथवा ग्रामीण भागातील कोणताही नागरिक केवळ पैशांअभावी किंवा अज्ञानामुळे आपल्या मूलभूत अधिकारांपासून व न्यायापासून वंचित राहू नये, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. न्यायालयाचे दरवाजे प्रत्येकासाठी खुले असून पात्र नागरिकांना मोफत विधी सहाय्य मिळवून देणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Physciobot

‘संवाद’ योजनेतून वंचित व आदिवासी घटकांना कायदेशीर संरक्षण :

ॲड. मधुमती कदम यांनी ‘नालसा संवाद (SAMVAD) योजना २०२५’ अंतर्गत मिळणाऱ्या विविध लाभांविषयी सखोल विवेचन केले. वंचित, उपेक्षित, आदिवासी बांधव आणि विमुक्त व भटक्या जमातींमधील घटकांना सरकारी कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणे, त्यांचे मूलभूत हक्क अबाधित राखणे आणि त्यांना मोफत कायदेशीर सल्ला व मदत उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

ग्रामस्थांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती :

या जनजागृती कार्यक्रमाला नेरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावागावांत जाऊन अशा प्रकारची कायदेविषयक माहिती पोहोचवण्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले.