मोबाईल हॅक करून बँक खात्यातून रक्कम परस्पर ट्रान्सफर; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
देवरूख : इन्स्टाग्रामवर आलेली संशयास्पद एपीके (APK) फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे संगमेश्वर तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. ही फाईल इन्स्टॉल करताच मोबाईल हॅक करून सायबर भामट्याने तरुणाच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून गुगल पे द्वारे तब्बल ५५ हजार ५९९ रुपये परस्पर लांबविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात युपीआय धारकाविरुद्ध फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेज सेशनदरम्यान डाऊनलोड केली एपीके फाईल :
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडवली साईनगर (ता. संगमेश्वर) येथील रहिवासी कु. कौस्तुभ संतोष सोमण (वय २१ वर्षे) हा ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयात लिंक्डइन सेशन सुरू असताना हजर होता. त्यावेळी त्याच्या मोबाईलवरील इन्स्टाग्रामवर आलेली एक अज्ञात ‘एपीके’ (APK) फाईल त्याने डाऊनलोड केली. सदर फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड होताच त्याचा मोबाईल अचानक हँग होऊन वारंवार बंद पडू लागला.

गुगल पे द्वारे ५५,५९९ रुपयांचा डल्ला :
मोबाईल पूर्णपणे सायबर भामट्याच्या नियंत्रणात गेल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.५२ वाजण्याच्या सुमारास कौस्तुभ सोमण याच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा देवरूख येथील बँक खात्यावरून ५५ हजार ५९९ रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर झाली. ही रक्कम ‘kumarrakesh2997@bpunity’ या अनोळखी युपीआय आयडीवर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले. आपली मोठी ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल; कसून तपास सुरू :
याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलिसांनी १ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री अज्ञात आरोपीविरुद्ध गु.र.नं. १५५/२०२६, भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) सह माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) २००० चे कलम ६६ (ड) प्रमाणे सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.
अनोळखी फाईल्स किंवा लिंक्स डाऊनलोड न करण्याचे पोलिसांचे आवाहन :
सोशल मीडियावरून, व्हॉट्सॲपवरून किंवा इन्स्टाग्रामवरून अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका अथवा कोणतीही ‘एपीके’ फाईल डाऊनलोड करू नका. अशा बनावट फाईल्समुळे मोबाईलमधील बँकिंग डेटा हॅक होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी व विशेषतः तरुण वर्गाने ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहावे, असे आवाहन देवरूख पोलिसांकडून करण्यात आले आहे.













