रत्नागिरीत मांडवी बीचवर तरुणावर लोखंडी फायटरने प्राणघातक हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरीत मांडवी बीचवर तरुणावर लोखंडी फायटरने प्राणघातक हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

फोनवरील वादातून मिटवण्यासाठी बोलावले अन् केली बेदम मारहाण; शहरात खळबळ

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध मांडवी बीचवर मित्रांमधील फोनवरील वाद मिटवण्यासाठी जमलेल्या तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. वाद मिटवण्याचे सोडून दोघा आरोपींनी एका १९ वर्षीय तरुणाला अश्लील शिवीगाळ करत लोखंडी फायटरने तोंडावर, डोक्यावर व पाठीवर मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राच्या फोनवरील वादातून मिटवण्यासाठी झाली भेट :

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईनगर, फणसोप येथील रहिवासी आणि विद्यार्थी असलेला स्वरूप रूपेश दोरखंडे (वय १९ वर्षे) याचा मित्र यश पवार याला रोहन ठिक याने फोनवरून शिवीगाळ केली होती. हा आपापसातील वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी हे सर्वजण गुरुवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास मांडवी बीच येथे एकत्र जमले होते.

Radhakrushna patapedhi

लोखंडी फायटरने तोंडावर व डोक्यावर वार :

मांडवी बीचवर चर्चा सुरू असताना अचानक वाद चिघळला. आरोपी रोहन ठिक आणि सोहम पड्यार यांनी फिर्यादी स्वरूप दोरखंडे याला अश्लील शिवीगाळ करत हाताच्या थापटांनी मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपी सोहम पड्यार याने आपल्या हातातील लोखंडी फायटरने स्वरूपच्या तोंडावर, डोक्याला आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बीच परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल :

या हल्ल्यानंतर जखमी स्वरूप दोरखंडे याने तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आरोपी १) रोहन ठिक (वय १९ वर्षे, रा. कोळंबे, ता. जि. रत्नागिरी) आणि २) सोहम पड्यार (वय १९ वर्षे, रा. पावस, ता. जि. रत्नागिरी) या दोघांविरुद्ध गु.र.नं. ३७८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.