Nate Police Burglaries Solved: नाटे सागरी पोलिसांची राजापुरात मोठी कामगिरी; ३ घरफोड्यांचा छडा लावत सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Nate Police Burglaries Solved: नाटे सागरी पोलिसांची राजापुरात मोठी कामगिरी; ३ घरफोड्यांचा छडा लावत सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या

भालावली, नाटे आणि नाणारमधील गुन्हे उघडकीस; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

राजापूर : तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत भामट्यांच्या मुसक्या आवळण्यात नाटे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. बंद घरे फोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवणाऱ्या चोरट्यांचा माग काढून पोलिसांनी एकापाठोपाठ एक घडलेले घरफोडीचे ३ वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या धडक कारवाईत आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांत तीन मोठ्या घरफोड्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भालावली वरचा भंडारवाडा येथील शेतकरी विश्वास भोसले यांच्या घरातून १ लाख ७० हजारांची सोन्याची साखळी, नाटे येथील ‘यश होम स्टे’मागील रोशन बच्छाव यांच्या बंद घरातून २ लाख १९ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, तसेच नाणार भटवाडी येथील निवृत्त सिस्टर लता साईम यांच्या घरातून चांदीची भांडी व साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते.

या सर्व घटनांचे गांभीर्य ओळखून नाटे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे नेटवर्क आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे कौतुकास्पद तपास मोहीम राबवली. तपासादरम्यान पोलिसांनी नाणार येथील घरफोडीप्रकरणी बीड जिल्ह्यातील कासारी (ता. आष्टी) येथील सराईत चोरटे संजय उर्फ मोहन निकाजा भोसले आणि नितेश उर्फ संतोष मरदान भोसले यांना जेरबंद केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी केली असून पोलीस कॉन्स्टेबल निखिल माने अधिक तपास करत आहेत. इतर दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींनाही पोलिसांनी गजाआड करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Shanti2

ही यशस्वी कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि लांजा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल नाटे पोलीस पथकाचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.