उत्पनापेक्षा वीजबिलाचा खर्चच अधिक; पालिकेच्या तिजोरीवर ताण
Ratnagiri Municipal Tourism Loss: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले नावीन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प आता पालिकेसाठी ‘पांढरे हत्ती’ ठरत आहेत. नगरपालिकेचे अत्याधुनिक मल्टिमीडिया ‘थ्रीडी शो’ आणि ‘शिवसृष्टी’ हे ड्रीम प्रोजेक्ट्स सध्या प्रचंड तोट्यात चालले असून, मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा विजेचा आणि देखभालीचा खर्चच पटीने अधिक असल्याने हे उपक्रम पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण आणत आहेत.
पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या २० महिन्यांच्या कालावधीत थ्रीडी मल्टिमीडिया शोमधून पालिकेच्या तिजोरीत अवघे ८ लाख रुपये महसूल म्हणून जमा झाले आहेत. याउलट, या प्रकल्पाच्या व्यवस्थापन आणि रोजच्या देखभालीवरच तब्बल ९ लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे, शो पूर्ण क्षमतेने सुरू असताना दरमहा दीड ते दोन लाख रुपये आणि शो बंद किंवा कमी क्षमतेने सुरू असतानाही पालिकेला १ लाख रुपयांपर्यंत विजेचे अव्वाच्यासव्वा बिल भरावे लागत आहे.
सध्या रत्नागिरी नगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देणे, शहरातील रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा सांभाळणे तसेच कंत्राटदारांची थकीत देणी चुकवण्यासाठी प्रशासनाला रोज तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा बिकट आर्थिक संकटाच्या काळात दरमहा लाखांच्या घरात निघणारे वीजबिल भरणे पालिकेच्या पूर्णपणे आवाक्याबाहेर गेले आहे.

पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प कायमस्वरूपी तोट्यात चालवण्याऐवजी तिकीटदरांचे पुनर्नियोजन करणे किंवा हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर चालवण्यास देणे, यांसारखे ठोस व धाडसी निर्णय पालिका प्रशासन कधी घेणार, याकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.













