अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात; शासकीय योजनांचा जागर

अलोरे येथे राष्ट्रीय पोषण माह व ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहात; शासकीय योजनांचा जागर

पोषक तृणधान्यांच्या पाककृती व रांगोळी प्रदर्शनाने वेधले लक्ष; जिल्हा परिषद सदस्या विनया झगडे यांची उपस्थिती

रत्नागिरी : एकात्मिक बालविकास सेवा योजना चिपळूण-१, बीट दादर-२ अंतर्गत अलोरे येथे ९ वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच आयसीडीएसचा (ICDS) स्थापना दिनही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अभियानांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी शासकीय योजनांची सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

*विविध शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन :

कार्यक्रमादरम्यान महिला व बालकांच्या हितासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांवर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने राज्य शासनाची ‘लेक लाडकी योजना’, केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ तसेच नवजात बालकांसाठीची ‘बेबी केअर किट वाटप योजना’ यांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व कल्याणकारी योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक पात्र व गरजू लाभार्थीपर्यंत कसे पोहोचवता येतील, याबाबत उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली.

Mahrashi karve ANM

आकर्षक पाककृती व पोषण रांगोळी प्रदर्शन :

महिला, नवजात बालके आणि किशोरवयीन मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात सकस व पोषणयुक्त आहाराचे महत्त्व किती अनमोल आहे, हे यावेळी पटवून देण्यात आले. जनजागृतीचा प्रभावी भाग म्हणून स्थानिक पोषक तृणधान्ये आणि हिरव्या पालेभाज्यांवर आधारित वैविध्यपूर्ण व पौष्टिक पाककृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यासोबतच पोषण संदेश देणारी आकर्षक रांगोळी आणि प्रबोधनात्मक जनजागृतीपर गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

*मान्यवरांसह महिलांची मोठी उपस्थिती : *

या विशेष अभियानाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषद सदस्या विनयाताई झगडे व पंचायत समिती सदस्य विनोद झगडे उपस्थित होते. याशिवाय दादर बीटच्या पर्यवेक्षिका मनिषा चिपळूणकर, आरोग्य विभागाचे सीचओ (CHO) श्री. होळकर, आरोग्य सेविका श्रीमती म्हाप्दी, शाळेचे शिक्षक श्री. गुडूकडे यांच्यासह परिसरातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माता-पालक, किशोरी मुली आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.