“ज्ञानेश कुमार हटावा, लोकशाही वाचवा!” चे आवाहन; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार काँग्रेसचे कार्यकर्ते
*रत्नागिरी :* देशात सध्या चर्चेत असलेल्या ‘व्होट चोरी’ प्रकरणावरून आणि निवडणूक आयोगाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर-दक्षिण) आक्रमक झाली आहे. “ज्ञानेश कुमार हटावा, लोकशाही वाचवा!” असे आवाहन करत या कारभाराचा निषेध करण्यासाठी सोमवारी (५ ऑक्टोबर) सकाळी १०:३० वाजता रत्नागिरीत भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
*निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र आक्षेप*
देशातील ‘व्होट चोरी’ प्रकरणाचे कर्तेधर्ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अन्य दोन्ही निवडणूक आयुक्तांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोगाची ही कार्यपद्धती म्हणजे थेट लोकशाहीची आणि संविधानाची हत्या असल्याचा घणाघात करत काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत देश पातळीवर संविधान व लोकशाही रक्षणासाठी हा लढा असाच सुरू राहील, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे.
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात*
नियोजित वेळापत्रकानुसार, सोमवारी सकाळी १०:३० वाजता घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मूक मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर हा मोर्चा शांततापूर्ण मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे.

*संविधानप्रेमी जनतेला सहभागी होण्याचे आवाहन*
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश कीर आणि प्रदेश सरचिटणीस श्रीमती हुस्नबानू खलिपे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम नागरिक, संविधानप्रेमी आणि कार्यकर्त्यांना लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी या मूक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.













