Ratnagiri rain: रत्नागिरीत यंदा सरासरीपेक्षा १४.६ टक्के कमी पाऊस; ३ तालुके दुष्काळाच्या छायेत

Ratnagiri rain: रत्नागिरीत यंदा सरासरीपेक्षा १४.६ टक्के कमी पाऊस; ३ तालुके दुष्काळाच्या छायेत

गतवर्षीच्या तुलनेत ९८३ मि.मी. पावसाची घट; परतीचा मान्सून वेगाने निघून गेल्याने भातशेती संकटात

*रत्नागिरी :* कोकणातील मुसळधार पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी दडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. जून ते सप्टेंबर या मुख्य मान्सून हंगामात जिल्ह्यात एकूण २ हजार ६८२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील सरासरी ३ हजार १४२ मि.मी. पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ४६० मि.मी. म्हणजेच १४.६ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.

*गतवर्षीच्या तुलनेत ९८३ मि.मी. पाऊस कमी*
गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना केल्यास यंदा झालेली पावसाची घट स्पष्टपणे दिसून येते. २४ सप्टेंबरअखेर यंदा जिल्ह्यात २,६१६.४४ मि.मी. पावसाची नोंद झाली होती; तर गतवर्षी याच कालावधीत ३,५९९.६७ मि.मी. पाऊस पडला होता. म्हणजेच यंदा तब्बल ९८३.२३ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. दरवर्षी ३ हजार मि.मी.पेक्षा अधिक पाऊस होणाऱ्या रत्नागिरीत ऑगस्ट आणि विशेषतः सप्टेंबर महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने पिकांच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

*जिल्ह्यातील ३ तालुके दुष्काळग्रस्त*
पावसाच्या या मोठ्या तुटीमुळे जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यात आला आहे. या तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे प्रशासकीय नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षी २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या सुमारे १०७ टक्के (३,५९९.६७ मि.मी.) पाऊस झाला होता, तर यंदा ७७.७७ टक्के (२,६१६.४४ मि.मी.) पाऊस झाल्यामुळे वर्षभराच्या सरासरीच्या तुलनेत ७४७.७८ मि.मी.ची मोठी तूट निर्माण झाली आहे.

Shanti real estate 1

*परतीचा मान्सून वेगाने बाहेर; हवामान खात्याचा अंदाज चुकला*
गेल्या दहा दिवसांपासून मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर अडकलेला परतीचा मान्सून अवघ्या काही तासांत महाराष्ट्रात दाखल झाला आणि दिवसभरात तब्बल ५० टक्के राज्य सोडले. यंदा १७ सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करणारा मान्सून ५ ते ६ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातून जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता; मात्र ३ ऑक्टोबर रोजीच मान्सूनने महाराष्ट्रातील बहुतांश भागातून काढता पाय घेतला असून आता तो दक्षिण भारताच्या दिशेने सरकला आहे.