Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेची शाही सांगता; भारत ८५ पदकांसह चौथ्या क्रमांकावर

Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धेची शाही सांगता; भारत ८५ पदकांसह चौथ्या क्रमांकावर

जपानच्या ऐची-नागोयामध्ये रंगला शानदार सांगता सोहळा; २१ सुवर्णांसह भारताची उत्कृष्ट कामगिरी

Asian Games 2026: जपानी संस्कृतीचे नयनरम्य दर्शन, नेत्रदीपक रोषणाई आणि संगीताच्या तालावर जपानमधील ऐची-नागोया येथे २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची शानदार सांगता झाली. आशियातील या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवात भारताने २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांसह एकूण ८५ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत ३४१ पदकांसह चीनने अव्वल स्थान राखले तर यजमान जपान दुसऱ्या स्थानावर राहिला.

*नीरू धांडाकडे भारतीय पथकाचे नेतृत्व*
सांगता सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या ट्रॅप नेमबाज नीरू धांडा हिने केले. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी या दिमाखदार सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. दोन आठवड्यांहून अधिक काळ रंगलेल्या या स्पर्धेत किमान ५० जागतिक विक्रमांसह ३५० हून अधिक नव्या विक्रमांची नोंद झाली. ४५ देशांच्या खेळाडूंनी या ९० मिनिटांच्या सोहळ्यात उत्सवी वातावरणाचा आनंद घेतला.

*दोहा २०३० कडे ध्वज सुपूर्द*
सोहळ्याच्या उत्तरार्धात ऑलंपिक कौन्सिल ऑफ आशियाचे (ओसीए) अध्यक्ष शेख जोन बिन हमाद अल थानी यांनी जपानच्या क्राउन प्रिन्स आणि क्राउन प्रिन्सेस अकिशिनो यांच्या उपस्थितीत स्पर्धेची अधिकृत सांगता जाहीर केली. त्यानंतर पहिल्या आशियाई स्पर्धेतील ऐतिहासिक मशाल, सुरुवातीचा ध्वज आणि सध्याचा ओसीए ध्वज कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कतारचा घोडेस्वार जासिम अल कुवारी याने घोड्यावर स्वार होऊन ओसीएकडून ध्वज स्वीकारला असून, २०३० ची पुढील आशियाई क्रीडा स्पर्धा कतारमधील दोहा येथे रंगणार आहे.

Gadre3