२००हून अधिक गाड्या भंगारात गेल्याने तुटवडा; विभागाकडून १५० नव्या ‘जिजाऊ’ बसेसची महामंडळाकडे मागणी
*रत्नागिरी :* रत्नागिरी जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलती आणि योजनांमुळे प्रवाशांची गर्दी वाढत असली, तरी रत्नागिरी विभागात अपुऱ्या बसेसमुळे पुन्हा एकदा एसटीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. विभागात तब्बल १२५ बसेसची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने दैनंदिन फेऱ्या चालवताना एसटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी, ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘लालपरी’च्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
*२०१९ च्या तुलनेत बसेस घटल्या; वडापचा घ्यावा लागतोय आधार*
सन २०१९ मध्ये रत्नागिरी विभागातून ६९४ बसेसद्वारे प्रवासी वाहतूक केली जात होती. मात्र, सध्या उपलब्ध गाड्यांची संख्या यापेक्षा खूपच कमी झाली आहे. मंडणगड, लांजा, राजापूर यांसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर बसेस वेळेवर येत नसल्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना वडाप, खासगी मिनी बस किंवा चारचाकी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
*रात्रीच्या वेळी साखरेपा भागातील प्रवाशांचे हाल*
आंबा घाटातून दिवसभर बसेसची वाहतूक सुरळीत सुरू असल्याने साखरेपा जाणाऱ्या प्रवाशांची अडचण येत नाही. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव संध्याकाळी ६:३० नंतर आंबा घाट वाहतुकीसाठी बंद केला जातो. त्यामुळे रात्रीच्या सर्व एसटी बसेस अणुस्कुरा घाटातून वळवल्या जातात. परिणामी, रात्रीच्या वेळी साखरेपा येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना महागड्या दराने रिक्षा किंवा खासगी वाहने करून प्रवास करावा लागत आहे.

*२००हून अधिक गाड्या ‘स्क्रॅप’; १५० नवीन जिजाऊ बसेसची मागणी*
केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार १५ वर्षे पूर्ण झालेल्या किंवा निर्धारित किलोमीटर धावलेल्या व्यावसायिक वाहनांना मोडीत (स्क्रॅप) काढले जाते. या नियमानुसार रत्नागिरी विभागातील २०० हून अधिक बसेस मागील काही महिन्यांत भंगारात निघाल्या आहेत. मात्र, त्या प्रमाणात नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या नाहीत.
या संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरी विभागाने महामंडळाकडे १५० नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची मागणी केली आहे. या अत्याधुनिक बसेसमध्ये सामान्य एसटीच्या तुलनेत १६ आसने (सीट्स) जास्त असून त्या अधिक आरामदायी आहेत. या नव्या बसेस लवकरात लवकर ताफ्यात दाखल झाल्यास रत्नागिरीकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.













