रत्नागिरी जिल्ह्यात १० महिन्यांत ९७ कर्करुग्ण

रत्नागिरी : जि. प. च्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारी जिल्ह्यात राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस साजरा करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील जानेवारी २०२४ पासूनची कर्करुग्णांची आकडेवारी ९७ असून, त्यापैकी १३ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे.

राष्ट्रीय कर्करोग जागरुकता दिवस कर्करोगाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम क्युरी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ७ नोव्हेंबर हा दिवस भारतात कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक केले जाते. कर्करोगाच्या उपचाराशी संबंधित गोष्टींचा प्रचार प्रसार केला जातो. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमार्फत राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, ता. गुहागर येथे कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे यांनी कर्करोगाबद्दल सखोल माहिती देऊन कर्करोग तपासणी व टाळण्यासाठी घ्यावयाची काळजीबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी आरोग्य सहायक भाटकर, जांभळे, आरोग्य सेवक खिल्लारे, आरोग्य सेविका देवकर तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

रक्त कर्करोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग, कोलन कर्करोग, घशाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, मेंदूचा कर्करोग सध्या सतत वाढताना दिसत आहे. तंबाखू किंवा गुटख्याचा वापर, सिगारेट आणि पेय, किरणोत्सर्गाचा दीर्घकाळ संपर्क, आनुवांशिक दोष, शारीरिक निष्क्रियता, कुपोषण, लठ्ठपणा यामुळे हे कर्करोग वाढत आहे. यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात तपासणी करून लवकर निदान करणे व उपचार घेणे आवश्यक आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 09/Nov/2024