संगमेश्वरात २२ हेक्टर भातशेतीचे नुकसान

देवरुख : संगमेश्वर तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भातकापणी रखडली असून, अजूनही ३० टक्के भातकापणी प्रतीक्षेत आहे. यावर्षी शेतकऱ्यांचे सुमारे २२ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान झाले आहे.

यावर्षी संगमेश्वर तालुक्यात सरासरी एवढा पाऊस पडला असला तरी भात कापणीला शेती तयार झालेली असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेती रखडली आहे. दिवाळीच्या अगोदर भात कापणी उरकली जाते; मात्र यावर्षी ही भात शेती रखडली आहे. जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका तसेच अवकाळी पावसामुळे भात रुजून वरती आले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. संगमेश्वर तालुक्यामध्ये ६ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केलेली होती. मात्र, या शेतीपैकी कृषी विभागाने केलेल्या सर्वेनुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये २२ हेक्टर क्षेत्रांवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. जंगली प्राण्यांच्या नुकसानीमध्ये ४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे. येत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 09/Nov/2024