खेड : येथील बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून छप्पर दुरुस्तीचे काम सुरू असून या ठिकाणी काम करणारे कामगार कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा साधनांचा वापर करत नाहीत. यामुळे स्थानकात दररोज वावरणाऱ्या शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.
खेड बसस्थानक परिसरातील सर्वच इमारती जीर्ण झाल्या असून, गेल्या दहा वर्षांपासून येथे स्थानकासाठी संपादित जागेवर नवीन बसस्थानक उभारण्याची मागणी केली जात आहे. राज्य परिवहन महामंडळ या मागणीकडे प्रतिसाद देताना दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून बसस्थानक परिसरात छप्पर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी काम करणारे कामगार अतिशय धोकादायक पद्धतीने काम करत आहेत.
कोणतीही सुरक्षा साधने न वापरता जीर्ण झालेल्या छपरावर चढून कामगार जुने झालेले पत्रे काढत असून, त्याचे तुकडे खाली कोसळत आहेत. हा प्रकार पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून, अपघात होऊन एखादा कामगार अथवा प्रवासी जखमी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 09/Nov/2024














