रत्नागिरी : ज्वालाग्रही पदार्थाच्या स्फोटात जखमी झालेल्या डोर्लेतील तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा; सूत्रधाराचा शोध सुरू..

पावस : रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथे ज्वालाग्रही पदार्थाचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ज्वालाग्रही पदार्थ कोणी ठेवले व त्याचा वापर कशासाठी केला जातो, त्याचा सूत्रधार कोण? याची चौकशी सुरू आहे; मात्र त्याला अजून यश आलेले नाही.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावस परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्था राहावी यासाती परवानाधारक लोकांच्या बंदुका ताब्यात घेण्यात आल्या; मात्र तरीही डोर्ले व गावखडी येथे विनापरवाना बंदूक व ज्वालाग्रही पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७५ शेती संरक्षक व २५ स्वसंरक्षक बंदुका पोलिस ठाण्यामध्ये जमा करण्यात आल्या आहेत. गावखडी भंडारवाडी येथेही विनापरवाना बंदूक सापडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या संदर्भात चौकशी सुरू आहे. या संदर्भात सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस सखोल चौकशी करत आहेत जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:20 PM 09/Nov/2024