Mandangad Burglary: तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

Mandangad Burglary: तुळशी येथे बंद घर फोडले; पावणेदोन लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

बंद घराची रेकी करून १.९५ लाखांचा ऐवज लंपास; पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Mandangad Burglary: (मंडणगड, जिल्हा रत्नागिरी) तालुक्यातील तुळशी येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि रोख रकमेसह सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

*साफसफाईसाठी गेलेल्या बहिणीमुळे चोरी उघडकीस
*मूळचे तुळशी येथील रहिवासी असलेले लखन परशुराम मोहिते (वय ३३) हे नोकरीनिमित्त सध्या आपल्या कुटुंबासह हिंजवडी फेज १ (पुणे) येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे गावातील त्यांचे घर बंद अवस्थेत होते.

दरम्याने, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास लखन मोहिते यांची बहीण घराची साफसफाई करण्यासाठी गेली असता, तिला घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटे उचकटलेली आणि साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ ही माहिती भावाला दिली. त्यानंतर मोहिते यांनी तातडीने पुण्यातून गावी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता घरात मोठी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.

Amey jwelrs

*१ लाख ९५ हजारांचा ऐवज लांबवला
*अज्ञात चोरट्यांनी २० सप्टेंबर सायंकाळी ४ ते ८ ऑक्टोबर सकाळी साडेदहा या कालावधीत घराच्या मुख्य दरवाजाचा लोखंडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी कपाटांचे लॉक तोडून खालील मुद्देमाल चोरून नेला:

सोन्याचे दागिने: सत्तर हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे जुने सोन्याचे मंगळसूत्र आणि एक लाख रुपये किमतीचे सुमारे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी.

भांडी व रोख रक्कम: पाच हजार रुपयांची जुनी तांब्या-पितळेची भांडी (तांबे, ताट, टोप, डबे) आणि वीस हजार रुपयांची रोख रक्कम.

*मंडणगड पोलिसांकडून कसून तपास सुरू
*या प्रकरणी लखन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) आणि भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बंद घराची रेकी करून ही घरफोडी केली असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मंडणगड पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.