सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ फांद्या छाटण्याची मागणी; आंदोलनाचा इशारा
चिपळूण: चिपळूण-गुहागर महामार्गावर मिरजोळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा झाडांच्या फांद्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तीव्र वळणावर समोरून येणारी वाहने दिसणे कठीण झाले आहे. या परिस्थितीमुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, संबंधित विभागाने तातडीने झाडांच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा करावा, अशी जोरदार मागणी मिरजोळी ग्रामपंचायत सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या मुमताज दलवाई यांनी केली आहे.
शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी वर्दळ
मिरजोळी परिसरामध्ये ‘नॅशनल इंग्लिश मिडीयम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’, ‘जिल्हा परिषद शाळा’ आणि ‘दलवाई हायस्कूल’ या तीन प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या मार्गावर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. याशिवाय गुहागर व आतील गावांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने येथे एस.टी. बस, मालवाहू वाहने आणि चिपळूण शहरात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची नेहमीच सतत ये-जा सुरू असते.
Chiplun Guhagar Highway Tree Branches Danger: धुक्याची भर अन् अंधाऱ्या वळणावर अपघातांचे सत्र
सध्या सकाळच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडत आहे. त्यातच रस्त्यावर झुकलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. या दृष्टीक्षेपातील अडथळ्यांमुळे किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करतानाच "वेळेत फांद्या छाटल्या नाहीत आणि एखादी मोठी दुर्घटना अथवा अपघात घडल्यास त्याला सर्वस्वी संबंधित विभागच जबाबदार राहील," असा थेट इशारा मुमताज दलवाई यांनी प्रशासनाला दिला आहे.













