चिपळूणमधील रस्ता रुंदीकरणाबाबत नगरपरिषदेत नागरिकांची आक्रमक बैठक; तांत्रिक त्रुटी पूर्ण न झाल्यास काम पुढे नेणार नाही – नगराध्यक्ष उमेश सकपाळ
चिपळूण: शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत जागामालकांच्या तांत्रिक शंका आणि समस्यांचे पूर्ण निराकरण झाल्याशिवाय कोणतीही घाई केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी जाहीर केली आहे. वेळ लागला तरी नागरिकांचे समाधान करूनच रुंदीकरणाचे काम हाती घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, भविष्यातील शहराच्या विकासासाठी रस्त्यांचे रुंदीकरण आवश्यक असून, त्यासाठी निधीही उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नागरिकांच्या ज्वलंत शंका आणि प्रशासनापुढील प्रश्न
छत्रपती शिवाजी चौक ते पाग पॉवर हाउस या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात सोमवारी सांस्कृतिक केंद्राच्या तालीम सभागृहात जागामालक आणि नगरपरिषद प्रशासनाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांनी सुरुवातीपासूनच प्रशासनाला धारेवर धरले. विशेषतः नगररचना विभागाच्या मोजणी, रेखांकन आणि जागा संपादन प्रक्रियेतील त्रुटींवर तीव्र प्रश्न उपस्थित करण्यात आले.

बैठकीत नागरिकांनी विचारलेले प्रमुख प्रश्न खालीलप्रमाणे होते:
रुंदीकरणात संबंधित जागामालकांची जागा नेमकी किती जाते?
दोन्ही बाजूकडील रेखांकन बिंदू कुठे टाकले जाणार?
जागेच्या बदल्यात पर्यायी व्यवस्था काय आहे?
रेखांकन आणि मोजणी घेताना दोन्ही बाजूंला समान रेखांकन होणार का? कुठल्या बाजूला किती जागा जाणार?
या तांत्रिक प्रश्नांना प्रशासनाकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने प्रशासनाची मोठी अडचण झाली.
पर्यायी रस्ते आधी तयार करा आणि पारदर्शक माहिती द्या
शहरातील दोन ते तीन प्रमुख रस्त्यांवर आधीच वाहतुकीचा ताण असताना रुंदीकरणाच्या काळात पर्यायी व्यवस्था काय असेल, असा सवलात नागरिकांनी उपस्थित केला. नगरपरिषदेकडे उपलब्ध असलेल्या पर्यायी रस्त्यांची माहिती देण्यात यावी आणि सध्या ताब्यात असलेले रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच, रुंदीकरणासाठी जागांची मोजणी करताना नगररचना विभागाकडून योग्य माहिती दिली जात नसल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला.
व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे तांत्रिक चर्चेचा निर्णय
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांच्या सर्व शंकांचे निरसन करून तांत्रिक बाबींची परिपूर्ण माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्यासाठी जागामालक आणि प्रशासनाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात येणार असून, पुढील काही दिवस रुंदीकरणासंदर्भातील तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. त्यानंतरच सर्वमान्य तोगा काढून रस्त्याचे रेखांकन आणि रुंदीकरणाचे काम पुढे नेले जाईल, असे नगराध्यक्षांनी सांगितले.













