Ratnagiri Sangameshwar Tural Bike Accident: तुरळ येथे दुचाकीचा भीषण अपघात; पाचल येथील तरुणाचा जागीच मृत्यू

Ratnagiri Sangameshwar Tural Bike Accident: तुरळ येथे दुचाकीचा भीषण अपघात; पाचल येथील तरुणाचा जागीच मृत्यू

लोखंडी संरक्षक कठड्यावर आदळल्याने मृत्यू; वसईचा मित्र जखमी, संगमेश्वर पोलिसांत गुन्हा

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत रविवारी सकाळी दुचाकीचा एक अत्यंत भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी रस्त्यालगत असलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यावर जोरदार आदळल्याने चालक अनिकेत नारायण लाड (वय ३०, रा. पाचल, ता. राजापूर) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेला त्याचा मित्र सुचित शांताराम गुरव (वय ३१, रा. वसई, जि. पालघर) हा रस्त्यावर फेकला जाऊन जखमी झाला आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसईहून गावाकडे येताना तुरळ हद्दीत घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील पाचल येथील रहिवासी असलेला अनिकेत लाड हा आपली यामाहा कंपनीची दुचाकी (क्रमांक एम.एच. ०३ ई.ई. ८३५६) घेऊन मित्र सुचित गुरव याच्यासह वसईहून आपल्या मूळ गावाकडे निघाला होता. रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सात ते सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ गावच्या हद्दीत पोहोचली. त्यावेळी अनिकेतचे वाहनावरील ताबा अचानक सुटला.

Ratnagiri Sangameshwar Tural Bike Accident: लोखंडी कठड्याला भीषण धडक; ऐन सणासुदीत पाचलवर शोककळा
अतिवेगात व बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे दुचाकी रस्त्यालगत असलेल्या लोखंडी संरक्षक पत्र्यावर जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर दोघेही दूर फेकत रस्त्यावर पडले. या भीषण अपघातात चालक अनिकेत लाड याला गंभीर अंतर्गत दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला सुचित गुरव जखमी झाला.

Shoping fest Khabardar

अपघातानंतर जखमी सुचित गुरव याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मयत चालक अनिकेत लाड याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सणासुदीच्या काळात गावी परतताना ऐन उंबरठ्यावर तरुणाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने पाचल परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.