मारुती मंदिर परिसरातील घटना; शहर पोलिसांत भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
*रत्नागिरी: *रत्नागिरी शहरातील गजबजलेल्या मारुती मंदिर परिसरातील गोपाळ हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने टेम्पो उभे केल्याप्रकरणी दोन चालकांवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन्ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडल्या आहेत.
गोपाळ हॉटेलसमोर बेकायदेशीर पार्किंग; दोन चालकांवर कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्या चालकांची नावे हेमंत बापू गजबोर (वय ३४, रा. पानवलकर चाळ, आरोग्य मंदिर, रत्नागिरी) आणि रोहन अनिल जगताप (वय २३, रा. साळवी स्टॉप झोपडपट्टी, रत्नागिरी) अशी आहेत.

पहिली घटना: चालक हेमंत गजबोर याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा सुप्रो मॅक्स मॉडेलचा टेम्पो (क्रमांक MH 08 AP 9366) मारुती मंदिर ते कोकणनगर मार्गावर गोपाल हॉटेलसमोर १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास उभा केला होता. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज यशवंत पडेलकर यांनी फिर्याद दिली आहे.
दुसरी घटना: चालक रोहन जगताप याने मारुती मंदिर ते मजगाव मार्गावर गोपाल हॉटेलसमोर मारुती सुझुकी कंपनीचा सुप्रो कॅरी मॉडेलचा टेम्पो (क्रमांक MH 08 BP 4224) सायंकाळी ७.२५ वाजण्याच्या सुमारास उभा केला होता. त्यामुळे रस्त्यावरील इतर वाहनांच्या ये-जा करण्यास गंभीर अडथळा निर्माण झाला होता.
रत्नागिरी शहर पोलिसांत गुन्हा दाखल
सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहने उभी करून इतर प्रवाशांना व वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी या दोन्ही चालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून मुख्य रस्त्यांवर अडथळा ठरणार्या वाहनांवर पुढील काळातही अशीच कारवाई सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.













