पावस रोडवरील घटना; रस्त्याकडेच्या पाईपला बसची धडक, काही प्रवासी जखमी
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील पावस रोडवर जिल्हा न्यायालयासमोर सोमवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. चालकाला अचानक डुलकी आल्यामुळे नियंत्रण सुटून एसटी बस रस्त्याकडेला ठेवलेल्या सिमेंटच्या मोठ्या पाईपवर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
सकाळी पावणेसहा वाजता घडला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शहर बस वाहतुकीची वायंगणी येथून येणारी एसटी बस सोमवारी सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी शहराच्या दिशेने येत होती. बस जिल्हा न्यायालयासमोरून जात असताना चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या पाईपवर जाऊन जोरात धडकली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील काचा फुटून रस्त्यावर विखुरल्या.

Ratnagiri District Court Bus Accident: बसमध्ये विद्यार्थी अन् नोकरदारांची मोठी गर्दी
सकाळची वेळ असल्याने या बसमध्ये शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आणि कामानिमित्त रत्नागिरी शहरात येणाऱ्या नोकरदार प्रवाशांची मोठी संख्या होती. अचानक झालेल्या या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. या अपघाताची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली आहे.













