रत्नागिरी : येथील खल्वायन संस्थेची ३०७ वी मासिक संगीत सभा उद्या (९ नोव्हेंबर) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत नेहमीप्रमाणे सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, एस. टी. स्टँड समोर, रत्नागिरी येथे आयोजीत करण्यात आली असून, कै. संजय मुळ्ये स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या मैफलीमध्ये मूळच्या आसामच्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या प्रसिध्द गायिका श्रृती बुजरबरुवा यांच्या शास्त्रीय ख्याल गायना बरोबरच ठुमरी, दादरा, गझल, अभंग व नाट्यसंगीत गायनाने सदरहू मैफल रंगणार आहे.
श्रुती यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून आई-वडील सौ. संगीता व श्री. मुनिंद्र बुजरबरुवा यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन मिळाले. पुढे त्यांनी भातखंडे संगीत विद्यापीठ, लखनौ येथून संगीत विशारद आणि संगीत अलंकार या पदव्या प्राप्त केल्या. २०१४ मध्ये त्या पुणे येथे रहायला आल्यानंतर त्यांनी प्रसिध्द गुरू पंडित विजय कोपरकर यांचेकडून काही वर्षे शास्त्रीय गायनाचे मार्गदर्शन घेतले. दरम्याने त्यांनी एस एन डी टी विद्यापीठ पुणे येथून मास्टर इन म्युझिक ही पदवी प्राप्त केली. तसेच एसएनडीटी विद्यापीठ येथूनच २०१९ साली बी.ए (म्युझिक) ही पदवी सुध्दा त्यांनी सर्वोत्तम गुण आणि गोल्ड मेडल सहीत प्राप्त केली आहे. सध्या त्यांचे वास्तव्य ठाणे – मुंबई येथे असून, सध्या त्या जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिध्द गायिका व गुरू विदुषी प्रतिमा टिळक यांचेकडून पुढील शास्त्रीय संगीताचे मार्गदर्शन घेत आहेत.
कोलकत्ता, मिरज, दिल्ली, अहमदाबाद, ओरिसा, वाराणसी, पुणे, मुंबई इ. ठिकाणच्या नामवंत संगीत महोत्सवात त्यांचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. इंटरनॅशनल फाउंडेशन, एन सी पी ए, आणि भारत सरकारची शास्त्रीय संगीतासाठी शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त आहे. विजया घाटे स्मृती आणि पंडिता रोहिणी भाटे स्मृती पुरस्काराने त्या सन्मानित आहेत.
या कार्यक्रमाला तबला साथ हेरंब जोगळेकर आणि हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन हे रत्नागिरीचे नामवंत वादक करणार आहेत. सर्व संगीत रसिकांनी मैफलीला उपस्थित राहून मैफल श्रवणाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी आणि सहकारी यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 09/Nov/2024













