अपघातात रक्तबंबाळ झालेल्या तरुणासाठी देवदूत ठरले राजू जाधव; तत्परतेने रुग्णालयात दाखल करून वाचवले प्राण

अपघातात रक्तबंबाळ झालेल्या तरुणासाठी देवदूत ठरले राजू जाधव; तत्परतेने रुग्णालयात दाखल करून वाचवले प्राण

विलणकर कुटुंबीयांकडून सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार, रहाटघर एसटी स्टँडसमोर गणपती विसर्जनाच्या दिवशी झालेल्या एका भीषण मोटारसायकल अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव देवदूत ठरले आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या तरुणाला कोणीही हात लावत नसताना जाधव यांनी तातडीने रिक्षातून शासकीय रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. या संवेदनशील कार्याबद्दल विलनकर कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा भावूक वातावरणात सत्कार करण्यात आला.

प्रसंगावधान राखून रिक्षातून हलवले रुग्णालयात :

गणपती विसर्जनाच्या दिवशी आठवडा बाजार परिसरात दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रक्त सांडले असल्याने जखमी तरुणाचा जागीच मृत्यू झाला असावा, या भीतीने ये-जा करणारे नागरिक त्याला हात लावण्यास धजावत नव्हते. त्याचवेळी जवळच असलेल्या पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून बाहेर पडणारे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अकाउंट ऑफिसर व सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावरील नागरिकांना मदतीचे आवाहन केले. मात्र, कोणी पुढे येत नसल्याचे पाहून त्यांनी एका रिक्षातील प्रवाशांना विनंती करून खाली उतरवले आणि रोहन ठाकूर, शेलार व अन्य दोन अनोळखी तरुणांच्या मदतीने जखमी तरुणाला रिक्षात घालून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले.

Shoping fest Khabardar

जखमी तरुण मुकुंद विलणकर असल्याचे आले समोर :

जखमी तरुण हा रत्नागिरीतील भाई विलणकर यांचा पुतण्या मुकुंद विलणकर असल्याचे समजताच जाधव यांनी तातडीने कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती दिली. सिव्हिल हॉस्पिटलमधील प्राथमिक उपचारानंतर मुकुंद यांना परकार हॉस्पिटल व त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले. कोल्हापूर येथे योग्य उपचार मिळाल्यानंतर मुकुंद विलणकर पूर्णपणे बरे होऊन सुखरूप आपल्या घरी परतले आहेत.

विलणकर कुटुंबीयांकडून कृतज्ञता व्यक्त; केला कौटुंबिक सत्कार :

ऐन मोक्याच्या वेळी देवदूतासारखे धावून येऊन आपल्या मुलाचे प्राण वाचवल्याबद्दल विलणकर कुटुंबीयांनी राजू जाधव यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. यावेळी भाई विलणकर, अण्णा विलणकर, स्वतः मुकुंद विलणकर, अंशूक विलणकर, श्वेता विलणकर, गायत्री विलणकर, गंधार विलणकर आणि किशोर शिवलकर उपस्थित होते.

माणुसकीचे कर्तव्य पार पाडले; अपघातातील जखमींना त्वरित मदत करा : राजू जाधव

सत्काराला उत्तर देताना राजू जाधव म्हणाले, "माणुसकीच्या नात्याने जे कर्तव्य होते तेच मी पार पाडले. मुकुंद सुखरूप घरी परत आला, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार आहे." तसेच, "अपघातग्रस्ताला मदत केली किंवा रुग्णालयात नेले तर पोलिसांचा त्रास होईल, या अनाठायी भीतीपोटी मागे न हटता नागरिकांनी जखमींना सर्वप्रथम रुग्णालयात दाखल करावे, जेणेकरून वेळेत उपचार मिळून एखाद्याचे प्राण वाचू शकतील," असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.