शिरगाव ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या निधीचा अपहार; तिघांवर अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

शिरगाव ग्रामपंचायतीत घरपट्टी, पाणीपट्टीच्या निधीचा अपहार; तिघांवर अलोरे-शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल

वसुलीचे १ लाख ४३ हजार रुपये बँकेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप; चिपळूण तालुक्यातील खळबळ

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मौजे शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांकडून वसूल करण्यात आलेली घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकराची लाखो रुपयांची रक्कम ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा न करता परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय दंड विधान (भादंवि) कलम ४०८, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसुलीची रक्कम ७ महिने ठेवली स्वतःजवळ :

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील घरपट्टी, पाणीपट्टी आणि वीजकर वसुलीची जबाबदारी संबंधित आरोपींवर सोपवण्यात आली होती. मात्र, नागरिकांकडून कर स्वरूपात वसूल करण्यात आलेली एकूण १ लाख ४३ हजार ६९ रुपयांची शासकीय रक्कम त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतीच्या अधिकृत बँक खात्यात भरणा केली नाही. ही रक्कम त्यांनी सुमारे ७ महिने बेकायदेशीररीत्या स्वतःजवळ ठेवून वैयक्तिक फायद्यासाठी वापरली.

Kohinoor furni.1

शासकीय नियमांचे उल्लंघन आणि गैरव्यवहार :

शासकीय परिपत्रके व वित्तीय नियमांचे उघड उल्लंघन करून ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारात गंभीर अनियमितता करण्यात आली, तसेच सार्वजनिक निधीचा अपहार करून विश्वासघात केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी शिरगाव (पाटीलवाडी) येथील रहिवासी सौ. निता निलेश शिंदे (वय ३३ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपी :

१) धनंजय दत्ताराम सोलकर (वय ३३ वर्षे, रा. शिरगाव, ता. चिपळूण)

२) दिनेश दत्ताराम धागडे (वय ४२ वर्षे, रा. शिरगाव, ता. चिपळूण)

३) श्रीकृष्ण गंगाराम कदम (वय ५० वर्षे, रा. शिरगाव, ता. चिपळूण)

या तिन्ही संशयितांविरुद्ध अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२६/२०२६ नुसार भादंवि कलम ४०८ (कारकुनाने किंवा कर्मचाऱ्याने केलेला फौजदारीपात्र न्यासभंग) व ३४ अन्वये गुन्हा दाखल झाला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.