Vilavade Railway Station Demands: विलवडे रेल्वेस्थानकाच्या विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चेबांधणी; आंदोलनाचा पाठपुरावा सुरू

Vilavade Railway Station Demands: विलवडे रेल्वेस्थानकाच्या विविध मागण्यांसाठी प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चेबांधणी; आंदोलनाचा पाठपुरावा सुरू

प्रशासनाकडून काही मागण्यांवर आश्वासने, मात्र महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी लढा सुरूच ठेवण्याचा संघटनेचा निर्धार

रत्नागिरी:
Vilavade Railway Station Demands: कोकण रेल्वेमार्गावरील विलवडे रेल्वेस्थानकाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रवासी संघटनेने पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गेल्या २० सप्टेंबर रोजी विलवडे रेल्वेस्थानकाजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. या उपोषणात विलवडे रेल्वेस्थानकावर अवलंबून असलेल्या सुमारे ७२ गावांमधील प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन काही मागण्या मान्य केल्या आणि पुढील पंधरा दिवसांत लेखी आश्वासने पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ६ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये, सध्याच्या फलाटावर पत्रा शेड व आधुनिक प्रतीक्षालय बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच विलवडे स्थानक ते मुख्य रस्ता या जोडमार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. याशिवाय, दुसरा फलाट बांधण्याकरिता निधीची तरतूद करण्यासाठी २०२७-२८ च्या अंदाजपत्रकात प्रस्ताव समाविष्ट करण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांना फलाटावर येणे सुलभ व्हावे, यासाठी रॅम्प बनवण्याचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.

Vilavade Railway Station Demands: प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांच्या थांब्यासाठी पाठपुरावा सुरूच
प्रशासनाकडून काही कामे मार्गी लावली जात असली, तरी विलवडे स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, कोचुवेली एक्स्प्रेस, मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्या थांबवण्याबाबत प्रशासन अद्याप कोणतेही ठोस आश्वासन देत नाहीये. त्यामुळे या प्रमुख गाड्यांच्या थांब्यासाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

Amey jwelrs

या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना विलवडे रेल्वेस्थानकाच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. त्यावेळी त्यांनी तातडीने संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देश आपल्या कार्यालयाला दिले आहेत. याशिवाय, कोकण रेल्वे मंडळाचे सदस्य तथा खासदार नीलेश लंके यांची भेट घेऊन विलवडे रेल्वेस्थानकावर अधिकाधिक एक्स्प्रेस गाड्या का थांबवल्या जाव्यात, याचे तांत्रिक व व्यावहारिक स्पष्टीकरण संघटनेतर्फे देण्यात आले.

या शिष्टमंडळात विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश काटकर, सरचिटणीस राज हांदे, सल्लागार सुभाष लाड, उपाध्यक्ष दीपक जानस्कर आणि सदस्य प्रकाश तोरस्कर हे पदाधिकारी उपस्थित होते. जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत ही संघटना शांत बसणार नसून सातत्याने मोर्चेबांधणी करत राहणार असल्याचे कार्याध्यक्ष रमेश काटकर यांनी स्पष्ट केले आहे.