रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’चा सांगता सोहळा; वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन
रत्नागिरी:
Abhijat Marathi Bhasha Saptah: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचे वैभव अधिक व्यापक करण्यासाठी दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवणे, वाचन संस्कृती जोपासणे आणि बोलीभाषांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे. मराठीचे अभिजातपण जपण्यासोबतच तिला ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करणे आणि जागतिक स्तरावर तिची ओळख अधिक दृढ करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे यांनी केले.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’च्या समारोप कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अंकलगे पुढे म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये मराठी भाषा केंद्रे उभारणे, विविध बोलीभाषांमधील साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून त्याला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणे गरजेचे आहे. मराठीचे वैभव जपायचे असेल तर केवळ शासनावर अवलंबून न राहता नागरिकांनी कार्यालयीन कामकाज, व्यवहार आणि दैनंदिन संवादात मातृभाषेला प्राधान्य दिले पाहिजे. इतर भाषा शिकताना मराठीची उपेक्षा होता कामा नये, असा सल्लाही त्यांनी दिला. संत ज्ञानेश्वरांसह अनेक संतांनी आणि साहित्यिकांनी दिलेला हा वारसा जपत मराठीला शिक्षण व संशोधनाची भाषा बनवण्याचे आवाहन त्यांनी केले.

Abhijat Marathi Bhasha Saptah: प्रशासकीय कामकाजात वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन
या कार्यक्रमात बोलताना उपजिल्हाधिकारी रोहिणी राजपूत म्हणाल्या की, महसूल खात्याचा कारभार अधिक प्रभावीपणे समजून घेण्यासाठी विभागीय परीक्षेच्या पुस्तकांसोबतच श्रीकर परदेशी यांची ‘महसूल मार्गदर्शिका’ आणि सी. डी. देशमुख यांचे ‘माझी प्रशासकीय कारकीर्द’ यांसारखी पुस्तके वाचली पाहिजेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थानिक बोलीभाषा व संस्कृतीचा आदर ठेवावा. आगामी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नऊ पुस्तके वाचणे, नऊ कविता ऐकणे किंवा नऊ पुस्तके भेट देणे अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांतून भाषेचा गोडवा वाढवून मराठी अधिक समृद्ध करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या समारोप कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, तहसीलदार (सर्वसाधारण) बजरंग चौगुले, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













