जिल्ह्याला १२ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट; सामाजिक संघटना, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांचा सक्रिय सहभाग
रत्नागिरी:
Ratnagiri Shramdan Bandhare Campaign: रत्नागिरी जिल्ह्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. आगामी उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आतापासूनच अलर्ट झाले आहे. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांना सोबत घेऊन जिल्ह्यात ‘मिशन बंधारे’ अंतर्गत वनराई, कच्चे आणि विजयी बंधारे उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे.
कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेत जिल्ह्याला एकूण १२ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत विविध तालुक्यांत मिळून ३०५ बंधाऱ्यांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून उर्वरित तालुक्यांमध्येही पाणीटंचाईची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार ग्रामस्थ, विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी तसेच राजकीय नेते पुढाकार घेऊन श्रमदानातून बंधारे बांधत आहेत.
Ratnagiri Shramdan Bandhare Campaign: तालुकानिहाय झालेले काम आणि पाण्याचा साठा
जिल्ह्यात आतापर्यंत १६९ कच्चे बंधारे, ४९ वनराई बंधारे आणि ९३ विजयी बंधारे असे एकूण ३०५ बंधारे उभारण्यात आले आहेत.

तालुकानिहाय झालेल्या कामांचा आढावा:
चिपळूण: ५३ कच्चे बंधारे, १० वनराई बंधारे, ०८ विजयी बंधारे (एकूण ६५)
दापोली: २१ कच्चे बंधारे, ०८ वनराई बंधारे, ११ विजयी बंधारे (एकूण ४०)
गुहागर: ४६ कच्चे बंधारे, ०९ वनराई बंधारे, २० विजयी बंधारे (एकूण ७५)
खेड: ०९ कच्चे बंधारे, ०१ वनराई बंधारा, १० विजयी बंधारे (एकूण २०)
लांजा: १४ कच्चे बंधारे, ०६ वनराई बंधारे, ४० विजयी बंधारे (एकूण ६०)
मंडणगड: ०४ कच्चे बंधारे, ०० वनराई बंधारे, ०१ विजयी बंधारा (एकूण ०५)
राजापूर: ०१ कच्चा बंधारा, ०३ वनराई बंधारे, ०० विजयी बंधारे (एकूण ०४)
रत्नागिरी: १९ कच्चे बंधारे, १२ वनराई बंधारे, ०२ विजयी बंधारे (एकूण ३३)
संगमेश्वर: ०२ कच्चे बंधारे, ०० वनराई बंधारे, ०१ विजयी बंधारा (एकूण ०३)
…तर पाणीसाठा टिकून राहतो:
सप्टेंबरमध्ये पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा नदी-नाल्यांचा प्रवाह काहीसा कमी होतो, अशा वेळी हे बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले जाते. नदी आणि नाल्यांचे पाणी अडवल्यामुळे आसपासच्या विहिरींची पाणीपातळी वाढते आणि भूजलाचा साठा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.
"जिल्ह्यात पाऊस थांबल्यामुळे वनराई बंधारे बांधण्याच्या कामांना गती मिळाली आहे. १२ हजार बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला मिळाले असून आतापर्यंत ३०५ बंधारे उभारण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे बंधाऱ्यांच्या आसपास असलेल्या विहिरींमधील पाणीसाठा वाढून यंदाच्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे."
— महेश नातेकर, कृषी सभापती, रत्नागिरी













