Komasap Sahitya Sammelan: कवी केशवसुतांच्या मालगुंडमध्ये रंगणार १८ वे कोकण मराठी साहित्य संमेलन; ध्वज व बोधचिन्हाचे दिमाखात अनावरण

Komasap Sahitya Sammelan: कवी केशवसुतांच्या मालगुंडमध्ये रंगणार १८ वे कोकण मराठी साहित्य संमेलन; ध्वज व बोधचिन्हाचे दिमाखात अनावरण

Komasap Sahitya Sammelan चे ध्वजारोहण जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते; मॉरिशसच्या दूतांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित

रत्नागिरी :
Komasap Sahitya Sammelan म्हणजेच कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे मध्यवर्ती साहित्य संमेलन येत्या २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आधुनिक मराठी काव्याचे जनक कवी केशवसुत यांची जन्मभूमी असलेल्या मालगुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवशीय साहित्यकुंभाच्या पूर्वसंध्येला बुधवारी संमेलनाचा अधिकृत ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण रत्नागिरीत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. तंत्रज्ञानाच्या आणि धावपळीच्या युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचे व जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे, असे भावस्पर्शी प्रतिपादन सातपुते यांनी यावेळी केले.

साहित्यध्वज म्हणजे संस्कृतीची उत्तुंग पताका
ध्वज व बोधचिन्ह अनावरण प्रसंगी बोलताना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले की, संमेलनाचा ध्वज ही केवळ कापडाची रेषा किंवा चित्र नसून ती साहित्य, विचार, संस्कृती आणि रसिकतेची एक उत्तुंग पताका आहे. हा ध्वज फडकणे म्हणजे केवळ एका सोहळ्याची घोषणा नसून माणसाच्या अंतःकरणातील संवेदनशीलतेला घातलेली साद आहे. ‘कोमसाप’ने कोकणचा भाषिक आणि सांस्कृतिक ठेवा अविरतपणे जपला असून, मालगुंड येथील कवी केशवसुतांच्या स्मारकाच्या साक्षीने होणारे हे संमेलन साहित्यप्रेमींमध्ये विचारांची नवी लाट निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विज्ञान आणि साहित्याची घालणार उत्तम सांगड
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी संस्थेच्या ३५ वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्ये संमेलने घेऊन ‘कोमसाप’ने आपली ओळख जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. यंदाच्या १८ व्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके भूषवणार असल्याने, आजच्या आधुनिक युगात साहित्य आणि विज्ञानाची एक उत्तम सांगड या संमेलनाच्या व्यासपीठावरून पाहायला मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. तरुण पिढीच्या हातात लेखणी यावी आणि त्यांनी साहित्यातून आपली मते मांडवीत, हाच या आयोजनाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.

Tava mahotsav

ग्रंथदिंडी आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती
संमेलनाचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले की, मालगुंड येथील केशवसुत स्मारकात होणारे हे संमेलन अखिल भारतीय पातळीच्या दर्जाचे करण्याचा प्रयत्न आहे. शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी विशेष ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाईल. या संमेलनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर, तसेच मूळच्या सावंतवाडीच्या कन्या व सध्याच्या मॉरिशसच्या राजदूत शीलाबाय बापू यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

मराठी भाषेचा जागर आणि उपक्रमांची माहिती
महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी अभिजात मराठी भाषेच्या संदर्भातील उपक्रमांचा आढावा घेतला. परिवहन व भाषा विभागाच्या माध्यमातून १ लाख ६० हजारांपेक्षा जास्त अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना सुलभ मराठी शिकवण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले. या अनावरण सोहळ्याला संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे व माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी यांसह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.