विजयादशमीला रत्नदुर्ग किल्ल्यावर भगवती दर्शनाने होणार समारोप; युवकांचा उस्फूर्त सहभाग
रत्नागिरी :
Durga Mata Daud Ratnagiri उपक्रमाला घटस्थापनेच्या मुहूर्तावर रत्नागिरी शहरात अत्यंत उत्साही वातावरणात प्रारंभ झाला आहे. येथील प्रसिद्ध मारुती मंदिर परिसरात उद्योजक संतोष तावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि ध्वजाला पुष्पहार अर्पण करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित या वार्षिक श्री दुर्गामाता दौडीचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या या दौडीत शहरातील तरुणांचा आणि शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
*
पहिल्या दिवशीचा मार्ग आणि दैनंदिन नियोजन*
दौडीच्या पहिल्या दिवशी मारुती मंदिर येथून प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर माळनाका, श्री व्याघ्रेश्वरी अंबामाता मंदिर, जैन नगर आणि एकता मार्ग या भागांतून मार्गक्रमण करत ही दौड पूर्ववत मारुती मंदिर येथे संपन्न झाली. पुढील संपूर्ण नवरात्रौत्सवात दररोज सकाळी मारुती मंदिर येथूनच या दौडीचा प्रारंभ होणार आहे. या माध्यमातून शहरातील विविध मंदिरांमध्ये जाऊन श्री दुर्गामातेचे दर्शन घेतले जाणार आहे.
पुढील दिवसांचे दौड मार्ग व कार्यक्रम
नियोजनानुसार १५ ऑक्टोबर रोजी आई माऊली मित्रमंडळ व सन्मित्रनगर, १६ ऑक्टोबरला थिबा पॅलेस रोड मित्रमंडळ, तर १७ ऑक्टोबर रोजी नाचणे येथील श्री नवलाई देवी मंदिरात जाऊन दुर्गामातेचे दर्शन घेतले जाईल. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी रविवारी तेली आळी नाका येथून दौडीची सुरुवात होऊन झाडगावच्या श्री जोगेश्वरी देवीचे दर्शन घेतले जाणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी जय भैरव नवरात्र मंडळ मांडवी आणि तेली आळी मित्रमंडळाच्या देवीचे दर्शन घेतले जाईल.
२० ऑक्टोबरला रत्नदुर्ग किल्ल्यावर होणार सांगता
विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच २० ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर येथून सर्व सहभागी नागरिक व युवक दुचाकी रॅलीने ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. तेथे श्री देवी भगवतीचे दर्शन घेतल्यानंतर या पारंपरिक श्री दुर्गामाता दौडीची औपचारिक सांगता होईल. या उपक्रमात सर्व हिंदूंनी, विशेषतः तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जयदीप साळवी आणि वैभव पांचाळ यांनी रत्नागिरीकरांना केले आहे.














