OCI कार्डधारक असलेल्या इम्रान खानवर मुंबई पोलिसांची कारवाई; भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर पाऊल
मुंबई :
Imran Khan India Leave Notice संदर्भात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक अपडेट समोर आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर छेडलेल्या आंदोलनात सहभागी होणे प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खानला (Imran Khan) चांगलेच महाग पडले आहे. परदेशी नागरिक असूनही भारतातील राजकीय-सामाजिक आंदोलनात भाग घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी इम्रान खानला येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडून जाण्याची अधिकृत नोटीस बजावली आहे.
आंदोलनातील सहभाग आणि पोलिसांची कारवाई
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी ऑगस्ट क्रांती मैदानावर कॉकरोच जनता पार्टीकडून निदर्शने करण्यात आली होती. या आंदोलनात उपस्थित राहून इम्रान खानने सीजेपीला जाहीर पाठिंबा दर्शवला होता. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी कारवाई करत इम्रान खानला घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. अभिनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
इमिग्रेशन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
इम्रान खानकडे भारतीय नागरिकत्व नसून तो ‘ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया’ (OCI Cardholder) म्हणजेच अमेरिकन नागरिक आहे. भारतीय नागरिकत्व नसताना देशातील आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतल्याबद्दल त्याच्याविरुद्ध ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट’च्या (Immigration and Foreigners Act) कलम ७ आणि २९ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत एफआरआरओ आणि मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपूर्वी देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

किरीट सोमय्या यांची मागणी अन् प्रतिक्रिया
या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. "इम्रान खान ओसीआय कार्डधारक असूनही भारतातील आंदोलनात सहभागी होत आहे, त्यामुळे त्याची तातडीने भारतातून हकालपट्टी करण्यात यावी," अशी मागणी त्यांनी केली होती. पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर प्रतिक्रिया देताना सोमय्या म्हणाले, "भारतात राहायचे आणि परदेशाचे नागरिकत्व बाळगून देशाविरोधी किंवा राजकीय स्वरूपाच्या कारवायांमध्ये सहभागी व्हायचे, हे खपवून घेतले जाणार नाही. इम्रान खानवर झालेल्या या कारवाईचे मी स्वागत करतो. भारतात राहून अशा कारवाया करणाऱ्या इतरांसाठीही हा एक स्पष्ट इशारा आहे."













