Kanjivara Solid Waste Project मधील त्रुटी व प्रदूषणाविरोधात नागरिक आक्रमक; चिकन वेस्ट आणणे व खड्ड्यात पुरणे १२ ऑक्टोबरपासून तात्काळ बंद
देवरूख (पुढारी वृत्तसेवा):
Kanjivara Solid Waste Project म्हणजेच देवरूख शहरातील कांजीवरा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील त्रुटी, अनधिकृत विल्हेवाट आणि त्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण याविरोधात आक्रमक झालेल्या नागरिकांच्या आंदोलनाची अखेर नगरपंचायतीला गंभीर दखल घ्यावी लागली आहे. नागरिकांनी छेडलेल्या आंदोलनानंतर देवरूख नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांना अधिकृत लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
कांजीवरा परिसरातील नागरिकांचे नगरपंचायतीसमोर आंदोलन

सोमवारी कांजीवरा परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत नगरपंचायत कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले होते. या घनकचरा प्रकल्पातील विविध त्रुटींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवा व पाणी प्रदूषण होत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. या आंदोलनानंतर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि स्थानिक नागरिकांची एक संयुक्त बैठक पार पडली.
*चिकन वेस्टवर पूर्णपणे बंदी अन् नियमांचे काटेकोर पालन
*
बैठकीदरम्यान योग्य व शास्त्रोक्त प्रक्रिया यंत्रसामग्री उपलब्ध होईपर्यंत कांजीवरा प्रकल्पात चिकन वेस्ट (कोंबड्यांचा टाकाऊ कचरा) आणणे किंवा खड्ड्यात पुरणे पूर्णपणे बंद राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय हरित लवादाचे (NGT) आदेश, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ आणि घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ चे काटेकोर पालन केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
संयुक्त पाहणी आणि कालबद्ध कृती आराखडा
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी प्रशासन आणि नागरिक प्रतिनिधींची संयुक्त पाहणी आयोजित केली जाईल. अनधिकृत विल्हेवाट पद्धती १२ ऑक्टोबरपासूनच तात्काळ बंद करण्यात येत असून, उर्वरित सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी कालबद्ध कृती आराखडा (Action Plan) सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन नगरपंचायतीने दिले आहे. या प्रशासकीय आश्वासनानंतर कांजीवरा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.













