स्वयंपाकघरात गळफास लावून संपवले जीवन; राजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
राजापूर :
Rajapur Suicide Case संदर्भात राजापूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. दारूच्या तीव्र व्यसनाला कंटाळून एका ३४ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील शेजवली (वरचीवाडी) येथे मंगळवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शेजवली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहत्या घरात घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, शेजवली येथील रहिवासी जयेश महादेव राणे (वय ३४ वर्षे) हा गेल्या काही काळापासून दारूच्या आहारी गेला होता. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरातील स्वयंपाकघरामध्ये लाकडी बाराला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. कुटुंबियांच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी राजापूर पोलिसांत आमृ. क्रमांक ६३/२०२६ (भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – कलम १९४) अन्वये अकस्मात मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. घटनेनंतर त्याच दिवशी सायंकाळी ६:१९ वाजता नोंद करून पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.














