पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर कांदळवनात आढळला मृतदेह; राजापूर तालुक्यावर शोककळा
राजापूर : Mahira Bhatkar Search Operation अखेर पाच दिवसांच्या अखंड आणि अथक प्रयत्नांनंतर संपुष्टात आले आहे. तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथील विस्तीर्ण खाडीपात्रात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक दुर्घटनेत खोल पाण्यात बेपत्ता झालेली १५ वर्षीय माहिरा जुनेद भाटकर हिचा मृतदेह अखेर कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत मिळून आला. एकाच घरातील चार निष्पाप भावंडांचा एकापाठोपाठ असा कारुणिक अंत झाल्याने भाटकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण राजापूर तालुक्यासह कोकण परिसर तीव्र शोकाकुलात बुडाला आहे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना
काही दिवसांपूर्वी जुनेद भाटकर यांच्या पत्नी हिना भाटकर या आपल्या लहान मुलांसह उदरनिर्वाहासाठी स्थानिक खाडीपात्रात कालवे (मुळे) काढण्यासाठी गेल्या होत्या. आई-वडील कामात मग्न असताना पाचही मुले खाडीकिनाऱ्याजवळ खेळत होती. मात्र, पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने आणि तळाशी असलेल्या खोल खड्ड्यांची कल्पना नसल्यामुळे ही मुले एकापाठोपाठ एक पाण्यात बुडू लागली. मुलांचा आक्रोश ऐकून आई-वडिलांनी आणि जवळ असलेल्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. उपस्थितांच्या तत्परतेमुळे एका मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र उर्वरित चार भावंडे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली.
युद्धपातळीवर शोधमोहीम अन् ५ दिवसांनंतर यश
या घटनेची माहिती मिळताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पथक, स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम सुरू केली होती. दुर्घटनेच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षीय मोहम्मद जुनेद भाटकर, ९ वर्षीय जुहेरिया जुनेद भाटकर आणि ११ वर्षीय बुशिरा जुनेद भाटकर या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. मात्र, १५ वर्षांची माहिरा पाण्यात बेपत्ता होती. नाटे सागरी पोलीस, बचाव पथके आणि स्थानिक मच्छीमार सलग पाच दिवस खाडीच्या कानाकोपऱ्यात तिचा शोध घेत होते. अखेर खाडीकिनारी असलेल्या कांदळवनात तिचा मृतदेह अडकलेला निदर्शनास आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेतला आहे.














