Imran Khan FRRO Notice: बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे FRRO चे निर्देश; मुंबई उच्च न्यायालयात घेणार धाव

Imran Khan FRRO Notice: बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे FRRO चे निर्देश; मुंबई उच्च न्यायालयात घेणार धाव

राजकीय आंदोलनात सहभाग घेतल्याने देश सोडण्याची नोटीस

मुंबई :
Imran Khan FRRO Notice प्रकरणी सध्या संपूर्ण चित्रपटसृष्टीसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेता इम्रान खान याला परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे कडक निर्देश देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हद्दपारीच्या नोटिशीला कायदेशीर आव्हान देण्यासाठी इम्रान खान मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे.

राजकीय आंदोलनात सहभाग अन् पोलिसांची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेता इम्रान खान याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले होते. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, इम्रान खान हा अमेरिकन नागरिक असल्याचा दावा केला. तसेच एका परदेशी नागरिकाने भारतातील राजकीय आंदोलनात भाग घेतल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली होती.

OCI कार्डधारकांसाठीच्या नियमांचे उल्लंघन; FRRO ची नोटीस
अभिनेता इम्रान खान हा ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्डधारक असल्याचे सांगितले जात आहे. नियमांनुसार OCI कार्डधारकांना भारतातील कोणत्याही राजकीय आंदोलनात अथवा राजकीय उपक्रमात थेट सहभाग घेण्यास सक्त मनाई आहे. या नियमावलीचा आधार घेत FRRO ने ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’ अंतर्गत इम्रान खानला नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार, त्याला येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Lok. Tilak hospi.

उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची शक्यता
FRRO च्या या निर्णयाला आव्हान देण्यासाठी इम्रान खान उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. MZM लीगलच्या वतीने ॲड. झुल्फिकार मेमन, ॲड. परवेझ मेमन आणि ॲड. चिराग नाईक ही कायदेशीर टीम त्याची बाजू मांडणार आहे. सरन्यायाधीश महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दूर असलेला इम्रान खान या ताज्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.