रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात अवघ्या १६ मिनिटे ४५ सेकंदांत कामगिरी पूर्ण; तीन आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्समध्ये नोंद
रत्नागिरी :
Irish Chakraborty Swimming Record या अवघ्या १ वर्ष ५ महिने वयाच्या चिमुकल्या जलतरणपटूने १०० मीटर जलतरण यशस्वीरीत्या पूर्ण करत क्रीडा जगतात जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. रत्नागिरी येथील शासकीय जलतरण तलावामध्ये पार पडलेल्या या विक्रमी प्रयत्नात आयरिशने २५ बाय २१ मीटरच्या तलावात सलग चार फेऱ्या मारत १०० मीटरचे अंतर अवघ्या १६ मिनिटे व ४५ सेकंदांत पार केले. इतक्या कोवळ्या वयात पाठीवर तरंगत (बॅक फ्लोटिंग) १०० मीटर अंतर पोहणारा तो जगातील सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. त्याच्या या अभूतपूर्व कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये अधिकृत नोंद झाली आहे.
तीन जागतिक रेकॉर्ड्समध्ये अधिकृत नोंद, ‘गिनिज’च्या मंजुरीची प्रतीक्षा
कमी वयात दाखवलेले कौशल्याचे हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले आहे. आयरिशने नोंदवलेल्या विक्रमाची तीन प्रमुख संस्थांकडून अधिकृत पुष्टी झाली असून, प्रतिष्ठेच्या ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ व ‘लंडन बुक ऑफ WORLD रेकॉर्ड्स’चा विक्रमी टप्पाही पूर्ण झाला आहे. या दोन्ही जागतिक संस्थांकडून अधिकृत कन्फर्मेशन लवकरच प्राप्त होणार आहे. कोकणातील या चिमुकल्याच्या यशामुळे स्थानिक क्रीडा वर्तुळात मोठे कौतुक होत आहे.
महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली ५ महिन्यांत घडला चमत्कार
आयरिश चक्रवर्ती याने रत्नागिरीतील ‘महेश मिलके स्विमिंग GROUP’मध्ये अवघे पाच महिने सराव केला. या अल्प कालावधीत मुख्य प्रशिक्षक महेश मिलके, प्रशिक्षिका गौरी मिलके, तनया मिलके आणि प्रशिक्षक करण मिलके यांनी त्याला अचूक तंत्रशुद्ध शिक्षण देऊन घडवले. केवळ पाच महिन्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर आयरिशने २५ मीटर तलावात सलग चार फेऱ्या पूर्ण करून ही ऐतिहासिक कामगिरी केली.

दुबई, पुण्यावरून थेट रत्नागिरीची वाट: पालकांचा प्रशिक्षकांवर दृढ विश्वास
आयरिशच्या पालकांनी दुबईहून भारतात परतल्यानंतर पुण्यात त्याच्या सरावाची सुरुवात केली होती. मात्र, त्याच्या अतिशय लहान वयामुळे पुण्यात सरावासाठी काही मर्यादा आल्या. त्यानंतर पालकांनी महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून थेट रत्नागिरीची वाट धरली. मिलके कुटुंबाच्या अचूक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर आयरिशने हा अद्भूत पराक्रम करून दाखवला असून, त्याच्या या अद्वितीय यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.













