संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-साळवीवाडी येथील घटनेप्रकरणी देवरूख पोलिसांत गुन्हा दाखल
देवरूख :
Deorukh Temple Theft प्रकरणी संगमेश्वर तालुक्यातील कुळ्ये-साळवीवाडी येथील नवीन नवलाई मंदिरात अज्ञात चोरट्याने मंदिरातील स्टीलची दानपेटी फोडून रोख रक्कमेसह सीसीटीव्ही यंत्रणेचे साहित्य पळवल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने दानपेटीतील सुमारे २ हजार रुपयांची रोकड लांबवली तसेच चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुमारे ७ हजार ५०० रुपये किमतीचा जुना सीसीटीव्ही डीव्हीआर (DVR) आणि हार्डडिस्कही चोरून नेली. या चोरीत एकूण ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ ऑगस्ट ते २ ऑगस्ट दरम्यान घडला प्रकार
पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १ ऑगस्ट रोजी सायं. ४ ते २ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली आहे. चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या स्टीलच्या दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड लंपास केली. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर व हार्डडिस्क काढून पळ काढला.
*
मुंबई मंडळाच्या बैठकीनंतर देवरूख पोलिसांत तक्रार दाखल*
गावाच्या मुंबई मंडळाचे पदाधिकारी व सदस्य गावी आल्यानंतर ग्रामस्थांच्या बैठकीत या चोरीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मूळचे कुळ्ये-साळवीवाडी येथील रहिवासी अनिल साळवी (वय ६४, सध्या रा. घाटकोपर, मुंबई) यांनी १४ ऑक्टोबर रोजी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद; तपास सुरू
अनिल साळवी यांच्या तक्रारीवरून देवरूख पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३४ (१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. देवरूख पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.














