शेअर मार्केट आणि आयपीओ ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ११ लाख ३७ हजार रुपयांचा छडा लावत दोन आरोपींना पोलीस कोठडी
रत्नागिरी: शेअर मार्केट आणि आयपीओ (IPO) ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रत्नागिरी सायबर पोलिसांना मोठे यश आले आहे. तंत्रज्ञानाचा अचूक वापर आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी तब्बल ११ लाख ३७ हजार १४ रुपयांच्या सायबर फसवणुकीचा छडा लावत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.
दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि तुषार चौधरी (रा. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून घातला गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी सुरुवातीला फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. संभाषणातून पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर भामट्यांनी आयपीओ (IPO) तसेच ओटीसी (OTC) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवले. आरोपींच्या भूलथापांना बळी पडून संबंधित दाम्पत्याने निरनिराळ्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये जमा केले.

मात्र, पैसे जमा केल्यानंतर कोणताच परतावा न मिळाल्याने आणि फसवणूक झाल्याची खात्री पटताच दाम्पत्याने तात्काळ सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे रचला सापळा
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक खात्यांमधील व्यवहारांचा मागोवा आणि गोपनीय बातमीदारांच्या आधारे सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान मनी ट्रेल सोलापूर येथील दादासाहेब चौगुले याच्याशी, तर ऑपरेटर ट्रेल धाराशिव येथील तुषार चौधरी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना रत्नागिरी येथे आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि पोलीस कॉन्स्टेबल आदर्श इंगवले यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.
नागरिकांना पोलीस अधीक्षकांचे सतर्कतेचे आवाहन
"शेअर मार्केट, ट्रेडिंग व ऑनलाइन गुंतवणुकीत अल्पावधीत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून अत्यंत सावध राहा. अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप अथवा टेलिग्राम ग्रुप्सवर दिल्या जाणाऱ्या टिप्सवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तिची सत्यता आणि संस्था अधिकृत असल्याची खात्री करा. फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा."
— नितीन बगाटे (पोलीस अधीक्षक, रत्नागिरी)













