आयपीओ व ओटीसी ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेला गंडा; न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडी
रत्नागिरी : शेअर मार्केटमध्ये आयपीओ (IPO) आणि ओटीसी (OTC) ट्रेडिंगच्या माध्यमातून कमी वेळेत भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याची तब्बल ११ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या इन्व्हेस्टमेंट फ्रॉड प्रकरणात सायबर पोलिसांनी सोलापूर आणि धाराशिव येथून दोन मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या आहेत.
व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून घातला ११ लाखांचा गंडा :
रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६ नुसार, सायबर भामट्यांनी फिर्यादी महिला व त्यांच्या पतीशी व्हॉट्सॲप (WhatsApp) द्वारे संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला होता. शेअर बाजारात आयपीओ आणि ओटीसी ट्रेडिंगद्वारे अवघ्या काही दिवसांत मोठा परतावा मिळेल, अशी बतावणी आरोपींनी केली. वारंवार संपर्क साधून या दाम्पत्याला जाळ्यात ओढत विविध बँक खात्यांवर एकूण ११ लाख ३७ हजार १४ रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, परतावा अथवा मूळ मुद्दल परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपी निष्पन्न; सोलापूर, धाराशिवमधून अटक :
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सायबर पोलीस पथकाने बँकेच्या व्यवहारांचा मागोवा (Money Trail), तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास चक्र वेगाने फिरवले. या तपासात मनी ट्रेलमधील आरोपी दादासाहेब चौगुले (रा. सोलापूर) आणि ऑपरेटर ट्रेलमधील तुषार चौधरी (रा. धाराशिव) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. आरोपींना रत्नागिरीत आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस पथकाची कामगिरी :
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव, पोलीस हवालदार संदीप नाईक, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कदम आणि आदर्श इंगवले यांच्या पथकाने केली.
गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका : पोलीस अधीक्षकांचे आवाहन
कमी वेळेत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या सायबर गुन्हेगारांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे. अनोळखी व्यक्ती, बनावट ॲप्स, व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप्सवरील गुंतवणुकीच्या सल्ल्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जास्त परताव्याचे आमिष हीच फसवणुकीची पहिली पायरी असते. फसवणूक झाल्यास नागरिकांनी तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.













