अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकण्याचा हवामान शास्त्रज्ञांचा प्राथमिक अंदाज; १६ ते २१ ऑक्टोबरदरम्यान मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता
रत्नागिरी: अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, आगामी सोमवारी (२६ ऑक्टोबर) रत्नागिरीच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची तीव्र शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. हे चक्राकार वादळ रत्नागिरीच्या सागरी क्षेत्रात वेग घेऊन पुढे मुंबईच्या दिशेने सरकण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या संभाव्य सागरी घडामोडींमुळे महाराष्ट्रात शुक्रवारपासूनच हवामानात मोठा बदल होऊन मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सप्टेंबरमध्येच वर्तवण्यात आला होता हवामान खात्याचा अंदाज
यंदा परतीचा मान्सून माघारी फिरताच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सलग तीन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता हवामान अभ्यासक व शास्त्रज्ञांनी सप्टेंबर महिन्यातच वर्तवली होती. त्या अंदाजानुसार, या मालिकेतील पहिले चक्रीवादळ २६ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात रत्नागिरीजवळ आकारास येत आहे. या चक्रीवादळाच्या तीव्र प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत १६ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण किनारपट्टी व मुंबईसाठी धोक्याचा इशारा
रत्नागिरीच्या सागरात तयार होणारे हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने मुंबईच्या रोखाने सरकणार असल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या या वादळी स्थितीमुळे किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, मच्छीमार आणि स्थानिक प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत.














