स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोहोळमध्ये धडक कारवाई; ग्रामीण पोलिसांच्या हवाली
रत्नागिरी : रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन वर्षांपूर्वी डंपर चोरी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत फरारी आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. समाधान शिवाजी चवरे (वय ३७ वर्षे, रा. तामडाल, पेनूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तीन वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात फेकत होता धूळ :
सन २०२३ मध्ये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक टिपर डंपर चोरीला गेला होता. याप्रकरणी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३/२०२३ दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी तत्पूर्वीच अटक केली होती; मात्र मुख्य साथीदार समाधान चवरे हा फरार झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात डंपर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना तो हवा होता. यापूर्वी इतर जिल्ह्यांतील तपास पथके त्याच्या मागावर गेली असता आपली ओळख लपवून आणि पोलिसांना चकवा देऊन तो पसार होण्यात यशस्वी ठरला होता.

तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरात सापळा :
फरार आरोपी समाधान चवरे हा सोलापूर जिल्ह्यातील पेनूर परिसरात वावरत असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी एलसीबीच्या पथकाने मोहोळ परिसरात धाड टाकून सापळा रचला आणि तीन वर्षांपासून पोलिसांच्या नजरेआड राहिलेल्या समाधान चवरे याला अखेर जेरबंद केले. त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाई करणारे तपास पथक :
सदर यशस्वी कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय आंबेकर (ब.नं. ९०९), पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश सावंत (ब.नं. ३०६), पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश नार्वेकर (ब.नं. २६५) आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे (ब.नं. २१५) यांच्या पथकाने केली आहे.













