भाजीपाला जळून खाक; नगरपालिकेच्या अग्निशमन दल व स्थानिक सैनिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
खेड (रत्नागिरी): खेड शहरातील अत्यंत गजबजलेल्या महाडनाका परिसरातील सुप्रसिद्ध ‘स्मार्ट बाजार’ येथे गुरुवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे स्मार्ट बाजाराच्या दर्शनी भागात विक्रीसाठी ठेवलेला संपूर्ण भाजीपाला जळून खाक झाला आहे.
अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या कौशल्यामुळे अनर्थ टळला
मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आगीचे लोट आणि धुराचे साम्राज्य पसरल्यामुळे महाडनाका परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अत्यंत कौशल्याने पाण्याचा मारा करत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. यामुळे ही आग मुख्य बाजारपेठेतील लगतच्या इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला आहे.
मदतकार्यासाठी नागरिक आणि लोकप्रतिनिधींची धाव
या दुर्घटनेची माहिती मिळताच खेडचे नगराध्यक्ष, स्थानिक नगरसेवक, युवा सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. आग पूर्णपणे विझवण्यासाठी स्थानिक तरुण व युवा सैनिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मोलाचे सहकार्य केले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. आगीचे नेमके कारण आणि या दुर्घटनेत झालेल्या एकूण आर्थिक नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.













