कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्क परिसरात बीएनएसएसचे कलम १६३ लागू; तिरंगा मार्चच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत २५ हजारांहून अधिक जवान तैनात
तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर, कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी अटकेची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत दिल्ली पोलीस आपल्याला केव्हाही अटक करू शकतात असा दावा केला आहे.
अभिजीत यांनी ‘एक्स’वर काही फोटो पोस्ट करत साध्या वेशातील पोलीस आपला पाठलाग करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, "मला नरेंद्र मोदींना सांगायचे आहे की आम्ही या गोष्टींना घाबरणार नाही. मी इथे बसलो आहे, या आणि मला घेऊन जा. या देशात तिरंगा फडकवल्याबद्दल तुरुंगात जावे लागले तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत."
सीजेपीची रॅली आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
कॉकरोच जनता पार्टीतर्फे (सीजेपी) सेंट्रल पार्क, कनॉट प्लेस येथे ‘लहरा दो तिरंगा’ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान सीजेपीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत असून आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या न्यायालयीन कोठडीचा निषेध केला जाणार आहे. मात्र, कनॉट प्लेस व त्याच्या आसपासच्या परिसरात भारतीय नागरी सेवा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच, नवी दिल्ली महानगरपालिकेने (एनडीएमसी) सुरक्षा कारणास्तव कनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्क १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी लोकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिरंगा फडकवण्यासाठीही परवानगी लागणार का? – दीपके यांचा सवाल
माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दीपके यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, "येथे वावरणारांवर दिल्ली पोलीस कोणतीही कारवाई करत नाही, मग पोलीस नेमकी कारवाई कोणावर करतात? सौरभ आणि आशुतोष यांना पोलिसांनी अटक केली, पण त्यांचा नेमका गुन्हा काय होता? त्यांनी केवळ तिरंगा फडकवला होता." तसेच, "प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज फडकवला पाहिजे, आता तो फडकवण्यासाठी सुद्धा लोकांना दिल्ली पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दिल्लीत चोख सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था
सीजेपीच्या या ‘तिरंगा फडकवा’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कनॉट प्लेस आणि परिसरामध्ये सुरक्षा दल मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून काही प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी अधिकचा वेळ राखण्याचे आणि शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कनॉट प्लेसचे सेंट्रल पार्क आणि राजीव चौक मेट्रो स्टेशनवर नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नवी दिल्ली व लगतच्या परिसरात २५ हजारहून अधिक पोलीस व निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केले असून, योग्य ठिकाणी निवडक व्यक्तींना राष्ट्रध्वज फडकवण्याची व राष्ट्रगीत गाण्याची परवानगी देण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.













