Imran Khan FRRO Notice: अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची एफआरआरओची नोटीस; किरण राव संतप्त, मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार

Imran Khan FRRO Notice: अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची एफआरआरओची नोटीस; किरण राव संतप्त, मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार

इम्रान खान याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्यामुळे एफआरआरओकडून कारवाई; ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभाग घेतल्याने ओसीआय (OCI) नियमांच्या उल्लंघनाचा आरोप

मुंबई: ‘जाने तू… या जाने ना’ फेम प्रसिद्ध अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान सध्या एका मोठ्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. मुंबई पोलिसांच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (FRRO) अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या नोटीसनंतर मनोरंजन आणि राजकीय विश्वात एकाच खळबळ उडाली असून आमिर खानची माजी पत्नी आणि चित्रपट निर्माती किरण राव हिने या कारवाईवर तीव्र शब्दांत आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली आहे.

किरण राव आणि सबा आझाद यांची सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस मिळाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर किरण राव हिने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. "वाह! आता मुंबई पोलीस?" अशा शब्दांत आश्चर्य व्यक्त करत किरण रावने इम्रानच्या समर्थनार्थ भूमिका मांडली.

इम्रानचे वय ४३ वर्षे असून त्याने आयुष्यातील तब्बल ४० वर्षे भारतातच घालवली आहेत. त्याचे शिक्षण, करिअर, यश-अपयश, प्रेम आणि संपूर्ण संघर्ष या भूमीवरच झाला आहे, ही बाब तिने अधोरेखित केली. किरण राव यांच्या या पोस्टनंतर अभिनेत्री आणि हृतिक रोशनची पार्टनर सबा आझाद हिनेदेखील या नोटीसवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Kohinoor furni.

‘ऑगस्ट क्रांती मैदान’ आंदोलनामुळे कारवाईचा बडगा
या संपूर्ण वादाची सुरुवात १० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात झालेल्या एका आंदोलनापासून झाली. मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात इम्रान खान, त्याची प्रेयसी लेखा वॉशिंग्टन आणि इतर आंदोलक सहभागी झाले होते. त्यादरम्यान मुंबई पोलिसांनी या सर्वांना काही काळासाठी ताब्यात घेतले होते. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इम्रान खानच्या आंदोलनातील सहभागावर आक्षेप घेत पोलीस व प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती.

OCI कार्ड आणि इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन?
अभिनेता इम्रान खानकडे अमेरिकेचे (USA) नागरिकत्व असून तो ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ (OCI) कार्डधारक आहे. मात्र, ओसीआय कार्ड म्हणजे पूर्ण भारतीय नागरिकत्व नव्हे. राजकीय किंवा निदर्शनांच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ‘इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट, २०२५’ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत एफआरआरओने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या नोटीसविरोधात इम्रान खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्याची तयारी करत आहेत. ओसीआय कार्डधारकांना अशा आंदोलनांत सहभागी होण्यास कायद्याने स्पष्ट मनाई आहे का आणि या कारवाईचा नेमका कायदेशीर आधार काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात उच्च न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.