संगमेश्वर तालुक्यात ग्रामरोजगार सहायकांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरूच; मनरेगाची कामे ठप्प होण्याची शक्यता

संगमेश्वर तालुक्यात ग्रामरोजगार सहायकांचे 'काम बंद' आंदोलन सुरूच; मनरेगाची कामे ठप्प होण्याची शक्यता

सरपंच आणि ग्रामसेवकांनी मस्टर न काढता सहकार्य करण्याचे संघटनेचे आवाहन; ५ ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन सुरू, गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

कडवई (संगमेश्वर, रत्नागिरी): महाराष्ट्रभरातील ग्रामरोजगार सहायकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या रास्त व न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामरोजगार सहायक संघटना, संगमेश्वर तालुक्याच्या वतीने ५ ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. शासनाने तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला असून, यामुळे तालुक्यातील रोजगार हमी योजनेची (मनरेगा) कामे पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोटापाण्याच्या व न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी लढा
ग्रामरोजगार सहायक गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत पातळीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) सर्व कामे, घरकुल योजना, फळबाग लागवड यांसह विविध शासकीय जबाबदाऱ्या अहोरात्र राबवत आहेत. मात्र या कामांच्या तुलनेत मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे असून शासनाकडून इतर आवश्यक सुविधाही दिल्या जात नाहीत.

अनेकदा ऑनलाईन व मैदानी कामे करताना कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याने त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

Echelon prive