Guhagar Flamingo Bird: गुहागर-असगोलीत अवतरला गुलाबी पंखांचा दुर्मिळ परदेशी पाहुणा: असगोली समुद्रकिनाऱ्यावर पक्षीप्रेमींसाठी आनंदवार्ता

Guhagar Flamingo Bird: गुहागर-असगोलीत अवतरला गुलाबी पंखांचा दुर्मिळ परदेशी पाहुणा: असगोली समुद्रकिनाऱ्यावर पक्षीप्रेमींसाठी आनंदवार्ता

उथळ पाणथळ जागी आढळणाऱ्या फ्लेमिंगोचे (रोहित पक्षी) खुल्या समुद्रकिनाऱ्यावर दर्शन; वनविभागाकडून ई-बर्ड (eBird) वर अधिकृत नोंद

गुहागर (रत्नागिरी): कोकणच्या निसर्गसमृद्ध किनारपट्टीवर पक्षीवैविध्याची साक्ष देणारी एक अत्यंत दुर्मिळ व आनंददायी घटना घडली आहे. गुहागर तालुक्यातील असगोली समुद्रकिनाऱ्यावर फ्लेमिंगो अर्थात ‘रोहित’ पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे. सहसा खाड्या, उथळ पाणथळ जागा आणि चिखलमय प्रदेशात आढळणारा हा देखणा पक्षी खुल्या समुद्रकिनाऱ्यावर मुक्तपणे वावरताना दिसल्याने परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वनविभागाची पाहणी
असगोली येथील स्थानिक नागरिक चिन्मय कचरेकर यांना समुद्रकिनाऱ्यावर हा फ्लेमिंगो दिसून आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता याची माहिती तातडीने वनविभागाला दिली. त्यानंतर वनरक्षक अरविंद मांडवकर यांनी गुहागरमधील पक्षीनिरीक्षक अक्षय खरे यांच्यासह असगोली किनाऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी हा फ्लेमिंगो किनाऱ्यावर अन्नाचा शोध घेताना आणि मुक्तपणे वावरताना आढळून आला.

‘ई-बर्ड’ जागतिक व्यासपीठावर नोंद
या दुर्मिळ पक्ष्याच्या दर्शनाची अधिकृत नोंद वनरक्षक अरविंद मांडवकर यांनी ‘ई-बर्ड’ (eBird) या पक्षीनिरीक्षणाच्या जागतिक व्यासपीठावर केली आहे. यामुळे असगोली किनारपट्टीवरील या नोंदीला पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

Shree clinic

कोकण किनारपट्टीवर विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी अधूनमधून दाखल होत असतात; मात्र असगोलीसारख्या खुल्या समुद्रकिनाऱ्यावर फ्लेमिंगोचे दर्शन घडल्याने स्थानिक जैवविविधतेबाबत नव्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. या पक्ष्याच्या आगमनामागील कारणे, त्याचा अधिवास आणि किनारपट्टीवरील खाद्याची उपलब्धता यांचा अभ्यास पक्षीनिरीक्षकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या अनोख्या पाहुण्याच्या दर्शनामुळे गुहागरच्या निसर्गवैभवात आणखी एका आकर्षक नोंदीची भर पडली आहे.