Madan Rathore BJP: ‘अमेरिका-पाकिस्तान युद्धात आम्ही पाकच्या बाजूने’; राजस्थान भाजप अध्यक्ष मदन राठोड यांच्या विधानाने नवा वाद

Madan Rathore BJP: 'अमेरिका-पाकिस्तान युद्धात आम्ही पाकच्या बाजूने'; राजस्थान भाजप अध्यक्ष मदन राठोड यांच्या विधानाने नवा वाद

जयपूरमधील भाजप कार्यालयात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती कार्यक्रमादरम्यान मदन राठोड यांचे वादग्रस्त वक्तव्य; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

जयपूर: राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मदन राठोड यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत आहोत, कारण पाकिस्तान आपला शेजारी देश आहे, असे विधान मदन राठोड यांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती कार्यक्रमात वक्तव्य
राजस्थान भाजपचे अध्यक्ष मदन राठोड हे माजी राष्ट्रपती आणि ‘भारतरत्न’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जयपूर येथील प्रदेश भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. डॉ. कलाम यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालण्याबाबत आणि त्यांच्या विचारांवर बोलताना राठोड म्हणाले की, डॉ. अब्दुल कलाम यांनी नेहमी साधेपणाने राहून शेजाऱ्यांना मदत करण्याची शिकवण दिली आहे. या शिकवणुकीचा संदर्भ देत त्यांनी शेजाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असा दावा करत अमेरिका-पाक युद्धाच्या प्रसंगी पाकिस्तानसोबत राहण्याचे भाष्य केले.

भाजपसाठी वक्तव्य ठरू शकते अडचणीचे
पाकिस्तानकडून भारतावर सातत्याने दहशतवादी हल्ल्यांचे प्रयत्न केले जात असल्याने भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व प्रकारचे संबंध तोडले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर पाकिस्तानची कोंडी करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध मानले जातात. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर भाजपच्या एका जबाबदार प्रदेशाध्यक्षाने आणि खासदाराने केलेले हे विधान आगामी काळात भाजप पक्षासाठी अत्यंत अडचणीचे ठरू शकते.

Infigo eyecare