तळवाडी, जाधववाडी, सुर्वेवाडी व भडकंबा बेर्डेवाडीचा वीजपुरवठा सुरळीत
साखरपा (संगमेश्वर, रत्नागिरी): संगमेश्वर तालुक्यातील साखरपा परिसरातील तळवाडी, जाधववाडी, सुर्वेवाडी आणि भडकंबा बेर्डेवाडी येथील नागरिकांना भेडसावणारी विजेच्या कमी दाबाची (Low Voltage) जुनी व गंभीर समस्या अखेर मार्गी लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते ओंकार संजय कोलते यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक पाठपुराव्यामुळे तळवाडी येथील जुना ६३ KVA चा ट्रान्सफॉर्मर बदलून त्याजागी थेट १०० KVA क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे.
नागरिकांचा त्रास संपला, आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली यश
याबाबत सविस्तर माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते ओंकार कोलते यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरामध्ये विजेचा दाब अतिशय कमी असल्यामुळे शेतकरी वर्ग आणि घरगुती वीजग्राहक प्रचंड त्रस्त झाले होते. ही महत्त्वाची समस्या त्यांनी आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. आमदार सामंत यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली त्यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच आपले मार्गदर्शक दिवंगत संतोष शेठ भिंगार्डे यांच्या शिकवणुकीतूनच आपल्याला सर्वसामान्यांच्या व लोकांच्या कामासाठी झटण्याची नेहमी प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महावितरण अधिकारी आणि स्थानिक नेत्यांचे सहकार्य
हा महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार किरण (भैय्या) सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, माजी सभापती जया माने, संजय सुर्वे आणि साखरपाच्या सरपंच रश्मी साळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच देवरुख विभागाचे महावितरण अधिकारी राणे साहेब आणि साखरपा विभागाचे कदम साहेब यांच्या सहकार्याने हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

चार वाड्यांमधील वीजपुरवठा सुरळीत
या नवीन १०० KVA च्या ट्रान्सफॉर्मरच्या उभारणीमुळे तळवाडी परिसरातील तब्बल चार वाड्यांमधील शेतीपंप आणि घरगुती वीजपुरवठा आता पूर्णपणे सुरळीत झाला आहे. अनेक दिवसांचा प्रश्न सुटल्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमधून तीव्र समाधान व्यक्त केले जात आहे.













