धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर बोनस मिळवून देणार; एसआयआर (SIR) प्रक्रियेवरून विरोधकांच्या आरोपांचा घेतला समाचार
जे राजकीय पक्ष आज ईव्हीएमच्या (EVM) विरोधात सातत्याने टीका करतात, त्यांच्याच यूपीए (काँग्रेस) सरकारच्या काळात देशात ईव्हीएम आणण्यात आले होते, आणि त्यावेळी त्यांना ते उत्तम वाटत होते, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी लगावला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या विविध आरोपांचा खरमरीत समाचार घेतला. एसआयआर (SIR) प्रक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले की, मृत पावलेल्या किंवा इतर ठिकाणी गेलेल्या लोकांच्या नावांमध्ये सुधारणा करण्याची ही एक कायदेशीर प्रक्रिया असून, बीएलओ (BLO) मार्फत सर्व राजकीय पक्षांना त्यावर आक्षेप घेण्याची संधी दिली जात आहे आणि ती प्रक्रिया सध्या सुरू आहे. पूर्ण झालेली प्रक्रिया बोगस कशी ठरवता येऊ शकते, असा सवाल त्यांनी केला. तसेच तरुण पिढीकडून उपस्थित होत असलेल्या मुद्द्यांचीही नोंद घेतली जात असल्याचे सांगत संकटाच्या या काळात विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनावर भाष्य
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याबद्दल बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, भारताची लोकशाही किती मजबूत आहे, हे आपण गेल्या ८० वर्षांत पाहत आलो आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जोपर्यंत या देशात आहे, तोपर्यंत ते सर्व नागरिकांसाठी कायमस्वरूपी लागू राहील. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या काळातही देशातील जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या मताची खरी किंमत दाखवून दिली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसबाबत महत्त्वाची घोषणा
धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बोनसच्या मुद्द्यावर बोलताना प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. विधानसभेत घोषणा झालेला बोनस शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना बोनस मिळवून देण्यासाठी आपली भूमिका मागील ४० वर्षांपासून कायम असल्याचे सांगत ते म्हणाले की, पूर्वी राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना कधीच बोनस मिळत नव्हता. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच महाराष्ट्रात धानाला बोनस देण्याची प्रथा सुरू झाली, जी आजही सुरू आहे. या प्रक्रियेत थोडा उशीर झाला म्हणून प्रत्येक गोष्टीवर सरसकट टीका करणे योग्य नाही. या विषयावर मुंबईत बैठक पार पडली असून, मुख्यमंत्री महोदयांच्या व्यस्त वेळापत्रकानंतर प्रत्यक्ष भेटून या समस्येवर निश्चित मार्ग काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या संकटावर राजकारण न करण्याचे आवाहन
यंदा महाराष्ट्रातील बळीराजा गंभीर संकटात सापडला असून शेतात पिकांची हानी, जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा वेळी राज्य सरकार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. मात्र, या संकटाच्या काळात विरोधकांकडून विनाकारण दगडफेक आणि राजकारण केले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा प्राथमिक स्वरूपात प्रत्येक कुटुंबाला व शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय असो, सरकार सर्वतोपरी पावले उचलत आहे. सरकार कुठेही ही अंतिम मदत असल्याचे म्हणत नाही, त्यामुळे संकटाच्या या संवेदनशील काळात राजकारण बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन परिस्थितीचा सामना केला पाहिजे, असे आवाहन खासदार प्रफुल पटेल यांनी केले आहे.













