आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा कोकणातील पहिले ‘आयआयए फेलो’ म्हणून विशेष सत्कार
रत्नागिरी :
IIA Ratnasindhu Subcenter अंतर्गत भारतीय वास्तुविशारद संस्था (आयआयए) रत्नसिंधु रत्नागिरी-सिंधुदुर्ग सबसेंटरच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ शहरातील ‘विवा एक्झिक्युटिव्ह’ येथे उत्साहात पार पडला. या पदग्रहण सोहळ्यादरम्यान आगामी दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नवीन समितीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मकरंद केसरकर (रत्नागिरी) यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
दोन वर्षांचा कार्यकाळ आणि नूतन कार्यकारिणी
या नूतन समितीचा कार्यकाळ २०२६ ते २०२८ असा दोन वर्षांचा असणार आहे. जाहीर झालेल्या कार्यकारिणीत विविध पदांवर पुढीलप्रमाणे फेरनियुक्ती करण्यात आली आहे:

अध्यक्ष: मकरंद केसरकर (रत्नागिरी)
उपाध्यक्ष: गौरी सामंत (वेंगुर्ले)
कोषाध्यक्ष: संजना शेट्ये (रत्नागिरी)
सचिव: श्रेया इंदुलकर (रत्नागिरी)
सल्लागार: आर्किटेक्ट संतोष तावडे
कार्यकारिणी सदस्य: नीलेश गुंदेचा (रत्नागिरी), प्रियदर्शन कोपरकर (दापोली), अपूर्वा मोहिते (रत्नागिरी), हर्षद सरवणकर (रत्नागिरी)
स्वीकृत सदस्य: मेघा पंडित बारटक्के (दापोली), शलिन कापडी (संगमेश्वर) व इतर सदस्य.
शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन; रविवारी रक्तदान शिबिर
पदग्रहण सोहळ्यानंतर झालेल्या बैठकीत पुढील दोन वर्षांच्या कालावधीत विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ‘आर्किटेक्ट फॉर लाइफ’ या विशेष उपक्रमांतर्गत सामाजिक जबाबदारीच्या नात्याने रविवारी (दि. १८ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता लायन्स आय केअर हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच ऑनलाइन वेबिनारचेही आयोजन करण्यात आले आहे.
आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा विशेष सत्कार
या पदग्रहण सोहळ्याचे औचित्य साधून कोकणातील पहिले ‘आयआयए फेलो’ (IIA Fellow) होण्याचा मान मिळवल्याबद्दल ज्येष्ठ आर्किटेक्ट संतोष तावडे यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.













