Chiplun Electricity Theft Case: टेरव येथे टॉवर उभारणीसाठी थेट आकडा टाकून वीजचोरी उघडकीस; वायरमनविरोधातही तक्रार

Chiplun Electricity Theft Case: टेरव येथे टॉवर उभारणीसाठी थेट आकडा टाकून वीजचोरी उघडकीस; वायरमनविरोधातही तक्रार

महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई; दंडाची रक्कम न भरल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार

चिपळूण:

Chiplun Electricity Theft Case अंतर्गत चिपळूण तालुक्यातील टेरव येथे मोबाईल टॉवरच्या उभारणीच्या कामासाठी महावितरणच्या विद्युत वाहिनीवरून थेट आकडा टाकून अनधिकृत वीजजोडणी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी सकाळी १०.५० वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या चिपळूण विभागीय कार्यालयातील भरारी पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता ही वीजचोरी निदर्शनास आली. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, दंडाची रक्कम मुदतीत न भरल्यास भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेल्या वायरमनविरोधातही ग्रामस्थांनी तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.

टेरव येथील पाहणीदरम्यान वेल्डिंग मशीन व ग्राइंडर सुरू असल्याचे आढळले
टेरव येथील पिकअप शेडजवळ एका मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू होते. महावितरणच्या भरारी पथकाने सकाळी १०.५० वाजता घटनास्थळी पाहणी केली असता, टेरव येथील गट क्रमांक १२५/३ मध्ये संतोष विश्राम म्हालीम यांच्या जागेत हे काम सुरू असल्याचे आढळले. टॉवरच्या ठिकाणी सिंगल फेज वेल्डिंग मशीनच्या साहाय्याने वेल्डिंगचे काम सुरू होते, तसेच लहान हँड ग्राइंडरही सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

Tata motars tiago

नवव्या विद्युत खांबावरून थेट आकडा; १३ ऑक्टोबरपासून अनधिकृत वीजजोडणी
तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी महावितरणचे कोणतेही विद्युत मीटर आढळून आले नाही. अधिक सखोल पाहणी केली असता, टेरव पिकअप डीपीपासून असलेल्या नवव्या विद्युत खांबावरील सर्व्हिस पोलवरून थेट आकडा टाकून वीजजोडणी केल्याचे निष्पन्न झाले. भरारी पथकाने केलेल्या चौकशीत ही अनधिकृत वीजजोडणी १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार महावितरणकडून संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली आहे.

भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार कारवाई; पंचनामा पूर्ण
भरारी पथकाने या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला असून, त्यावर साक्षीदार म्हणून रिया राकेश म्हालीम आणि राकेश संतोष म्हालीम यांनी सह्या केल्या आहेत. भारतीय विद्युत कायदा कलम १३५ नुसार निर्धारित दंडात्मक रक्कम न भरल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वायरमन मालप यांच्याविरोधात ग्रामस्थांची तक्रार; कारवाईची मागणी
दरम्यान, या वीजचोरीच्या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी महावितरणकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी वायरमन मालप यांच्याकडे या वीजजोडणीबाबत विचारणा केली असता, महावितरणकडून तात्पुरते (टेंपररी) मीटर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी भरारी पथकाच्या पाहणीत घटनास्थळी कोणतेही विद्युत मीटर आढळले नाही. त्यामुळे वायरमन यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सविता बाळकृष्ण कदम यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वायरमनवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कारवाई करणारे महावितरणचे पथक
महावितरणच्या भरारी पथकाचे प्रमुख तथा अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, सहाय्यक अभियंता राजेंद्र रासकर, प्रवीण फाळके आणि अक्षय जाधव यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.